कुणी नोकरीसाठी येतयं का….नोकरीसाठी…!!

  •  नाशिकच्या आरोग्य विभागाचा शोध; २००० पदांवर फक्त २०४ जण झालेत रूजू

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची इभ्रत निघाली. मनुष्यबळ नसल्याने आरोग्य विभागाकडून तत्काळ भरतीची ऑनलाईन जाहिरात काढण्यात आली. पण या जाहिरातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही, किंबहुना या विभागात नोकरीसाठी कुणीच इच्छुक नाही, असेच दिसून आले.

सध्याच्या वाढत्या बेरोजगारीवर नुसती चर्चा बरेचजण बोलतात. कोरोनामुळे तर नोकरी मिळणे तर सोडाच अनेकांच्या नोकरीवर गंडातर आले आहे. वर्क फ्रॉम होममध्ये घरून जास्त काम होऊ लागल्याने मालकवर्गही कार्यालये, विभाग बंद करून तो खर्च वाचवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

एरवी नोकरीची जाहिरात निघाल्यावर त्या जागांवर तुटून पडत मिळेल त्या माध्यमातून नोकरी मिळवायची, असा खटाटोप सुरू राहतो मात्र आरोग्य विभागाच्या या भरतीत मात्र उलटे चित्र पहायला मिळाले आहे.

बुलाते है,आतेही नही….

मनुष्यबळ नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नाशिक विभागात तत्काळ कोविड १९ अंतर्गत विविध पदांसाठी दोन हजार ४७ जागांची जाहिरात असताना प्रत्यक्षात २०४ उमेदवारच रूजू झाले आहेत. गंमत म्हणजे आलेल्या अर्जांपैकी ८८२ उमेदवार पात्र असल्याने आरोग्य विभागाकडून त्यांना रूजू होण्याचे आदेशही देण्यात आले होते. प्रत्यक्षात २०४ जणच रूजू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी पडत असलेल्या मनुष्यबळाला आधार देण्यासाठी ही जाहिरात काढली. यातील पदे कंत्राटी जरी असलेतरी नोकरी मिळण्याची स्पर्धाही इतर वेळी या पदांसाठी सुरु असते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तरूण होतकरू वर्ग नोकरीसाठी या भरतीला प्रतिसाद देण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात एप्रिल मे व जून उलटून गेल्यावरही या भरतीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, हे कटू सत्य आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*