मराठा आरक्षणावरून पार्थ पवारांनी ठाकरे – पवार सरकार घेरले; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

  • “विवेकच्या आत्मत्येनंतर तरी मराठा नेत्यांनी जागे होऊन लढावे”

वृत्तसंस्था 

मुंबई : मराठा आरक्षणावरून विरोधक ठाकरे – पवार सरकारवर टीका करत असताना शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे म्हटले आहे.

 

यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाले आहेत. पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.

 

“मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरू होण्याआधी मराठा नेत्यांनी जागे होऊन लढावे. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती आहे,” असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.

 

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही. मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसंच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.”

 

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक असे या तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*