मराठा आरक्षणासाठी भाजप शर्थीचे प्रयत्न करेल; तो विषय पवारांना झेपणारा नाही

  • “नातवाची लायकी काढणे आणि कोलांट्या उड्या मारण्याएवढे सोपे नाही”
  • निलेश राणे, अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र
  • स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार?; राणेंचा पवारांना टोला

वृत्तसंस्था 

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना निलेश राणे आणि आमदर अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांना टोला लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे

‘उदयनराजे व संभाजीराजे या दोघांनाही भाजपने राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. मराठा आरक्षणाबाबत दोन्ही राजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच पवारांनी त्यांना टोला लगावला होता. निलेश राणे यांनी पवार यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

‘शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आश्चर्य वाटतं. पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढे कळले की पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही,’ असे ट्विट निलेश राणे त्यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भाजप खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करा अशी भूमिका मांडली होती. मराठा समाज आता एकटा नाही, एवढेच सांगतो. मी सोबत आहे, असेही ते म्हणाले. तर, सरकार दखल घेत नसेल लढावेच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

“पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही”, अशी टीका भातखळकर यांनी केली.

“भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे शरद पवार म्हणालेत. मराठा आरक्षणाबाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या उड्या मारण्याइतके सोपे नाही,” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*