काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप नेते वसीम बारी यांची हत्या


  • बारींचे आठ सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्मीरमध्ये भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष वसीम बारी, त्यांचे वडील आणि भावाची बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी उशीरा हा हल्ला झाला. हे तिघेही त्यावेळी त्यांच्या घराच्या जवळच असणाऱ्या त्यांच्या दुकानात होते.

काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ते वसीम अहमद बारी यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर बशीर जखमी झाल्. या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तिघांचाही मृत्यू झाला.

बांदीपोराचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बशीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांच्याही डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ते म्हणाले, “रात्री पावणे नऊ वाजता तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आले. तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या परंतु, हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.”

काश्मीरमध्ये झालेल्या या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. त्यांनी पीडित कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केली असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रात्री उशीरा ट्वीट करत म्हटले आहे.

ही हत्या म्हणजे काश्मीरमधला राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मात्र असे हल्ले काश्मीरमधला आवाज दाबून टाकू शकत नसल्याचे भाजपच्या जम्मू-काश्मीर युनिटचे प्रवक्ते अनिल गुप्तांनी बीबीसीला सांगितले. ते म्हणाले, “वसीम गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष होते. ते एक सक्रीय कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यही करत होते. ते घराजवळच्या त्यांच्या दुकानात बसले होते. दहशतवादी आले आणि त्यांना गोळ्या घातल्या.

महिन्याभरापूर्वीच एका दहशतवादी संघटनेने आमच्या भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या होत्या. अशा प्रकारच्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो.” सीमेपलिकडच्या सूचनांनुसार या हत्या केल्या जात असल्याचा आरोप गुप्तांनी केला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रात्री उशीरा ट्वीट करत म्हटलंय, “हे पक्षाचं मोठं नुकसान आहे. या कुटुंबाला माझ्या सहवेदना. सगळा पक्ष या संतप्त कुटुंबासोबत आहे. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो.”

इतर राजकीय पक्षांकडूनही घटनेचा निषेध

ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत म्हटलंय, “बांदीपोरामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि त्यांच्या वडिलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबद्दल ऐकून दुःख झालं. या हल्ल्याचा मी निषेध करतो. दुःखाच्या काळात मी या कुटुंबाच्या सोबत आहेत. मुख्य प्रवाहातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सतत निशाणा साधण्यात येतोय आणि ही दुःखाची गोष्ट आहे.”

वसीम बारींच्या आठ सुरक्षा गार्ड्सना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ला झाला तेव्हा एकही सुरक्षा गार्ड बळी पडलेल्यांच्या सोबत नव्हता असं जम्मू -काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या आधीही काश्मीर खोऱ्यातल्या विविध भागांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची हत्या झाली आहे.

भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी वसीम बारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तरुण भाजप नेत्याच्या निधनामुळे आपल्याला अतोनात दुःख झालं असं राम माधव यांनी म्हटले आहे. सरचिटणीस बीएल संतोष यांनी देखील वसीम बारी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. त्याचा गुन्हा फक्त इतकाच होता की त्याने हातात तिरंगा घेतला होता असं त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था