हाथरस प्रकरणी पोलिसांचे १९ एफआयआर; योगी सरकारविरोधात बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला ५० लाखांची ऑफर

  • देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचाही आरोप

वृत्तसंस्था 

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून १९ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यामधील एक एफआयआर अज्ञातांविरोधात असून देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर तिच्या कुटुंबाला राज्य सरकारविरोधात खोटे बोलण्यासाठी ५० लाखांची ऑफर देण्यात आली होती, असेही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, “राज्य सरकारविरोधात खोटे बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला काही घटकांकडून ५० लाखांची ऑफर देण्यात आली. याशिवाय उत्तर प्रदेशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

एका अज्ञात पत्रकाराने पीडितेच्या भावाला आई-वडिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ते राज्य सरकारवर समाधानी नसल्याचे सांगण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील खोटी विधाने सोशल मीडियावर व्हायरल करत सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचाही आरोप एफआयआरमध्ये आहे.

हाथरस प्रकऱणी एकूण १९ एफआयआऱ दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण हाताळण्यावरुन टीका होत असताना पोलिसांनी राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या प्रगतीविरोधात नाराज असणारे घटक प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर या केसेस दाखल करण्यात आल्या. एफआयआरसंबंधी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी, “हाथरस घटनेमागे मोठे षडयंत्र असून आम्ही सत्याचा तपास करू,” असे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*