काँग्रेस – राष्ट्रवादीचाच ठाकरे सरकारसोबत घातपात; “ग्रीडफेल” राऊतांना चंद्रकांत दादांचा टोला

  • “मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना कित्येक महिन्यांपासून हेच सांगतोय”
  • भाजपाची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्विट करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठणकावून उत्तर दिले आहे. घातपात ठाकरे सरकारसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच करत आहेत, इतर कोणी नाही, असे प्रत्युत्तर चंद्रकांत दादा पाटील यांनी राऊत यांना दिले.

नितीन राऊत यांनी घातपाताचे ट्वीट केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या या ट्विटवरून आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत त्यांना टोला लगावल्याचे दिसत आहे.

“नितीन राऊतजी मी आपले महापॉवरकट बाबतचे ट्वटि वाचले. तुम्ही म्हणत आहात की, हा घातपात असू शकतो. मी देखील मुख्यमंत्र्यांना कित्येक महिन्यांपासून हेच सांगत आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीच या सरकारसोबत सतत घातपात करत आहेत. कधी पोलिसांच्या माध्यमातून, कधी आर्थिक निर्बंधांच्या माध्यमातून तर कधी कोविड व्यवस्थापनाच्या माध्यमातून. कोण जाणे हा जो प्रकार घडला कदाचित तो सुद्धा अशाच पद्धतीचा घातपात असावा”. असे खोचक ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

या प्रकरणात भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. “कायम डोक्यात जातीय विचारांमुळे अंधार असलेले महाराष्ट्राचे “ग्रीडफेल” मंत्री नितीन राऊत यांनी परवाची ग्रीडफेल हा घातपात असल्याचा दावा केला आहे. इतक्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पना राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे.हा घातपात आहे, हे ऊर्जा मंत्र्यांना केव्हा कळालं. मग त्यांनी याची कल्पना गृह विभागाला का दिली नाही? याचाही खुलासा करावा,” असे भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

अगोदर नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटसंबंधी पत्रकारांशी बोलताना मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणे साधी बाब नाही, त्यामुळेच आपण घातपाताची शक्यता वर्तवली असल्याचे म्हटले होते. ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

“मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये. म्हणूनच याच्यामध्ये निश्चितच घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं. काही लोक खासकरुन ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीकोनातून काहीही घडू शकतं. ते पडताळून पाहणं राज्याचं ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे, ते मी करतोय,” असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झाले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*