मुख्यमंत्र्यांच्या नाकदुऱ्या काढताना शरद पवार बेजार


राज्यातील महाविकास आघाडीतील अंतर्गत कलहांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वैतागले आहेत. त्यातच गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिवचल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगलेच संतप्त झाले होते. त्यांच्या नाकदुऱ्या काढता काढता शरद पवार बेजार झाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील अंतर्गत कलहांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वैतागले आहेत. त्यातच गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिवचल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगलेच संतप्त झाले होते. त्यांच्या नाकदुऱ्या काढता काढता शरद पवार बेजार झाले आहेत.

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज होते. त्यातच अजित पवार यांचे लाडके आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले. विशेष म्हणजे त्यांचा पारनेरमध्येच पक्षप्रवेश घडविण्यापेक्षा उत्साहाने त्यांना ते बारामतीला घेऊन आले. याठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा घडवून आणला. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची बोलतीच बंद झाली होती.

सरकार बांधले गेले त्याप्रमाणे संघटनाही अजित पवार यांच्या दावणीला बांधली का, अशी विचारणा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना होऊ लागली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळे शेवटी शरद पवार यांना अजित पवार यांना सोबत घेऊन जाऊन उध्दव ठाकरे यांची समजूत काढावी लागली.

त्या अगोदर शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत हालचाली केल्या होत्या. आमदार निलेश लंके यांनी पक्षांतरामध्ये अजित पवार यांचा संबंध नाही. उलट त्यांनी यासाठी विरोध केला होता. आपणच त्यासाठी आग्रही होतो, असे म्हणून सगळे पातक आपल्या डोक्यावर घेतले. उध्दव ठाकरे यांंना भाजपाची धास्ती दाखविल्यावर ते लगेच कोणतीही गोष्ट मानतात, याची शरद पवारांना कल्पना आहे. त्यामुळे या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेतले नसते तर ते भारतीय जनता पक्षात गेले असते असेही पसरविण्यात आले. त्यानंतर अजितच पवारांना उध्दव ठाकरे यांच्यासमोर नेण्यात आले. अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या स्वभावाला मुरड घालून माघार घेत या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत जाण्यासही सांगितले.

मात्र, या सगळ्या प्रकरणात शरद पवार यांची दोन दिवस चांगलीच धावपळ झाली. शरद पवार यांच्या निकटवर्तियांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते असताना दरवेळी उध्दव ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी त्यांनाच जावे लागते, हे योग्य नाही असे ते म्हणत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था