आरे कारशेड स्थलांतर अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेची चौकशी

  • चंद्रकांत पाटील यांच्याकडून ठाकरे – पवार सरकारची खरडपट्टी 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारची खरडपट्टी काढली आहे. आरेमधील मेट्रो कारशेडचे स्थलांतर सरकारच्या अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही घेतलेले निर्णय केवळ आकसापोटी रद्द करण्याचा सपाटा या सरकारने सुरू केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बिनधास्त करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा मात्र ही योजना केवळ सरकारची नसून यामध्ये लोकसहभाग देखील होता हे लक्षात घ्या.”

0.17 % नमुन्यांवरून संपूर्ण योजनेबाबत तर्क लावणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामध्ये लोकांनी त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी देणगी दिली आहे. त्यांची देखील तुम्ही चौकशी करणार का असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. “तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारा या योजनेचा फायदा झाला आहे की नाही.

तुम्ही आमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे त्यांना विचारा की त्यांनी किती काम केले आहे. त्यामुळे केवळ आकस मनात धरून चौकशी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आरेमधील कारशेड हलवणे सरकारच्या अंगाशी आले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*