अजब तर्कट मांडून राऊतांनी घेतली अजित पवारांची कड


म्हणे, पारनेरच्या नगरसेवकांना अजित पवारांनी फोडलेच नाहीत…!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पारनेरमध्ये अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडूनही संजय राऊतांनी अजितदादांचीच कड घेतली आहे.  “पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही,” असे अजब तर्कट संजय राऊत यांनी मांडले आहे.

आता हा विषय चर्चेत येऊ नये, असे संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नाहीत. अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकासआघाडीत नाहीत. हे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केल्याची मखलाशी संजय राऊत यांनी केली.

राऊत म्हणाले, “हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचे कुणी राजकारण करू नये. त्यावरुन काही वाद नाही. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. महाविकास आघाडीत अंतर्विरोध, अंतरपाट नाही, आम्ही वरमाला घातल्या आहेत. तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवले आहे, ही खिचडी नाही, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास करत देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्यांचा अर्थ तितकासा खरा नाही.”

पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याचं चर्चा रंगली होती. तसंच शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्टीकरण दिले.

संजय राऊत म्हणाले, “पारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं. स्थानिक राजकारणाचा भाग होता. यापुढे असा निर्णय घेताना एकमेकांशी बोलावं. काही गोष्टी अनावधनाने घडत असतात. त्या प्रसंगाचं काय होईल याची कल्पना नसते, जिथे व्हायची तिथे चर्चा झाली आहे. त्यामुळे कुरबुरी, धूसफूस आहे असं बोलू नये.”

…म्हणून त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : रोहित पवार

पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत सर्व निर्णय हे वरच्या पातळीवर होतात. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय कुठला निर्णय होत नाही, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पाचही नगरसेवक अंतर्गत राजकारणाला कंटाळून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत होते. त्याचा दुष्परिणाम हा महाविकास आघाडीवर होऊ नये, यासाठी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी केल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती