शत्रूशी हातमिळवणी करताना त्यांना काही वाटत नाही. चोरांकडून पैसे घेताना त्या कचरत नाहीत. रिमोट कंट्रोल पंतप्रधान बनवितात आणि पंतप्रधान मदत निधीतून पैसेही घेतात. सोनिया गांधी यांना भारताशी ऐवढी दुश्मनी का आहे, हेच कळत नाही असा हल्लाबोल केंद्रीय महिल आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शत्रूशी हातमिळवणी करताना त्यांना काही वाटत नाही. चोरांकडून पैसे घेताना त्या कचरत नाहीत. रिमोट कंट्रोल पंतप्रधान बनवितात आणि पंतप्रधान मदत निधीतून पैसेही घेतात. सोनिया गांधी यांना भारताशी ऐवढी दुश्मनी का आहे, हेच कळत नाही असा हल्लाबोल केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केला.
मध्यांचलातील अवध, कानपूर आणि बुंदेलखंड येथील कार्यकर्त्यांशी जनसंवाद रॅलीमध्ये बोलताना कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर ईराणी यांनी चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, अमेठीतून तुम्हाला उखडून टाकले आहे. आता रायबरेलीतील निकालही बदलण्यास वेळ लागणार नाही.
राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीचा उल्लेख करताना ईराणी म्हणाल्या, आपल्या मुलाबाळांचे देशासाठी बलिदान देण्याची बुंदेलखंडातील मातांची परंपरा आहे. मात्र, ही आई वेगळीच आहे. रायबरेलीतील खासदारांनी आपल्या मुलांसाठी देशाला लुटण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. गांधी परिवाराची विकासाची कल्पना आपल्या कुटुंबापर्यंतच मर्यादित आहे. हे देशासाठी अत्यंत हानीकारक आहे.
कोणी कल्पनाही केली नसेल की देशाला हे देखील पाहावे लागेल की मंत्र्यांना आपले मंत्रीपद टिकविण्यासाठी राजकीय हप्ते द्यावे लागतील. परंतु, मनमोहन सरकारमध्ये हे झाले. पण ज्यांनी सत्तर वर्षे देशाला लुटले आहे त्यांना याचे काहीही वाटणार नाही. संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या अध्यक्षांनी स्थापन केलेल्या राजीव गांधी फाऊंडेशनसाठी मेहूल चोक्सीसारख्या घोटाळेबाजाकडून देणगी घेण्यात आली. त्याबदल्यात त्याला काय दिले याचाही हिशोब कॉँग्रेसने द्यायला हवा.
देशाची बागडोर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम हातात आहे असे सांगून ईराणी म्हणाल्या, राष्ट्रनायक मोदी यांनी देशातील जनतेच्या दु:खांना दूर करण्याचे काम केले आहे. आयुष्यमान भारत सारख्या योजनेतून १० कोटी कुटुंबांना वैद्यकीय सहाय्य मिळाले आहे. याची कोणी कल्पनाही केली नव्हती पण एक वर्षांत त्याचा फायदा एक कोटी कुटुंबांना मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील १८ लाख कुटुंबांनी त्याचा फायदा झाला आहे.