सिल्वर ओकमधील सहाजणांना कोरोना; शरद पवार मात्र कोरोना निगेटिव्ह; राजेश टोपेंची माहिती

  • पवार कोणालाही भेटणार नसल्याची माहिती

वृत्तसंस्था

मुंबई : शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थावरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर शरद पवारांचीही चाचणी करण्यात आली. मात्र पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून ते व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

शरद पवार सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं. “शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांना दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याचे कारण नाही,” असे राजेश टोपे म्हणाले.

सिल्व्हर ओकवरील ज्या सहा जणांना कोरोनाची लागण झाली यामध्ये शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आणि स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. या सगळ्यांवर उपचार सुरु आहेत. तर स्वयंपाक करणाऱ्या महिलेवर वरळीतील डोम येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान सुरक्षारक्षकांपैकी कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.

कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कराड दौऱ्यानंतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही कोरोना चाचणी त्यानंतर पॉझिटिव्ह आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे. काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*