श्रीमंत लोक लक्षणे नसताना आयसीयू बेड अडवतात; राजेश टोपेंचे अजब तर्कट

  • ट्रेसिंग करणे रामबाण उपाय; चाचण्या कमी केल्या नसल्याचाही दावा

वृत्तसंस्था

मुंबई : दुर्देवाने काही श्रीमंत लोक जे खर्च उचलू शकतात ते आयसीयू बेड अडवतात. त्यामुळे अनेकदा आयसीयू बेड्सची कमतरता जाणवते असे अजब तर्कट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लढवले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चाचण्या कमी करण्यात आल्या नसून नियंत्रण आणण्यासाठी ट्रेसिंग करणे रामबाण उपाय असून त्यावर भर दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

टोपे म्हणाले, “अनेकदा रुग्ण स्वत:च आयसीयूत दाखल होण्याचा निर्णय घेतात. दबाव आणून आयसीयू बेड अडवले जात आहेत. छोट्या शहरांमध्येही हे सुरू असून ते चुकीचे आहे. आयसीयू बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत.

कोणतीही लक्षणे नसणाऱ्यांना ते द्यायला नकोत. पण दुर्देवाने काही श्रीमंत लोक जे खर्च उचलू शकतात ते आयसीयू बेड अडवतात. त्यामुळे अनेकदा आयसीयू बेड्सची कमतरता जाणवते. याबद्दल जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना जागरुक राहावे लागेल. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड देण्यावर प्रतिबंध आणावे लागतील.,”

चाचण्यांचे प्रमाण कमी केल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळला. ते म्हणाले, “अजिबात असे काही नाही. १०० टक्के ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. नियंत्रण आणण्यासाठी ट्रेसिंग करणं रामबाण उपाय आहे. करोना रुग्णाच्या संपर्कातील २० जणांना ट्रेसिंग कऱणं आम्ही बंधनकारक केलं आहे. जे कमी करत आहेत त्यांना सतत सूचना देत आहोत.

ट्रेसिंग वाढलं की टेस्टिंग वाढतं. त्यात जे पॉझिटिव्ह आढळतात त्यांना क्वारंटाइन केलं जातं, उपचार दिले जातात”. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी बोलताना चौकशी करून माहिती घेऊ. योग्य पद्धतीने त्यावरील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*