वाढीव वीज बिलामुळे आत्महत्या, सरकार आता तरी जागे होईल का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

वाढीव वीज बिलांमुळे सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच मेटाकुटीस आलेले असताना नागपुरात एका नागरिकाने यामुळे आत्महत्या केली आहे. सरकार आता तरी जागे होईल का असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वाढीव वीज बिलांमुळे सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच मेटाकुटीस आलेले असताना नागपुरात एका नागरिकाने यामुळे आत्महत्या केली आहे. सरकार आता तरी जागे होईल का असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्यात जून-जुलैच्या महिन्यात नागरिकांना प्रचंड वीज बिल आले आहे. यामुळे सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मात्र, उर्जा मंत्री नितीन राऊत मात्र वीज बिल कसे योग्य आहे सांगत आहेत. वीजवापर वाढल्याने बिल जास्त आल्याचा निर्लज्ज दावाही ते करत आहेत. मात्र, राऊत यांच्याच नागपूर शहरातील एका नागरिकाने वाढीव वीजबिलाचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे. लीलाधर गायधने असे त्यांचे नाव आहे.

एका सामान्य नागरिकाच्या झालेल्या मृत्यूमुळे फडणवीस प्रचंड संतप्त झाले आहेत. ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या शॉकमधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का?’

कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा !’, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*