राष्ट्रपती राजवटीच्या धास्तीने शिवसेना चिडीचूप

भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलेला मुक्त संचाराचा अधिकार डावलून अभिनेत्री कंगना राणावतला मुंबईत येण्यास मज्जाव करणारी शिवसेना राष्ट्रपती राजवटीच्या धास्तीने एकदम चिडीचूप झाली.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलेला मुक्त संचाराचा अधिकार डावलून अभिनेत्री कंगना राणावतला मुंबईत येण्यास मज्जाव करणारी शिवसेना राष्ट्रपती राजवटीच्या धास्तीने एकदम चिडीचूप झाली.

मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना यांच्यात वाद सुरू झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला धमक्या देणे सुरू केले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाचे थोबाड फोडण्याची धमकी दिली. शिवसेनेनं कंगनाला आपल्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला दिला होता.

या टीकेला उत्तर देत तिनं शिवसेनेलाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर झालेल्या वादात शिवसेनेने सूडबुध्दीने कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवित अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे संपूर्ण राज्यातील सामाजिक वातावरण दूषीत झाले आहे. या सगळ्या वादाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे.

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या भीतीने शिवसेना एकदम चिडीचूप झाली.

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेत शिवसेना सत्तेत असल्यामुळे शिवसेनेच्या इशार्यानेच ही कारवाई झाल्याचा आरोप झाला. या कारवाईवरून अनेकांनी शिवसेनेवर व पयार्यानं राज्य सरकारवर टीका केली होती.

एका महिला अभिनेत्रीविरुध्द सुरू असलेल्या या सगळ्या अन्यायामुळे राज्यपाल कोश्यारीही व्यथित झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलावून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसर्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असे राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवरच महापालिकेच्या कारवाईनंतर सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही सहमत आहात का? असे ट्विट कंगनाने केले आहे. त्यामुळे तर शिवसेना आणि महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष प्रचंड धास्तावले आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची बहिण श्वेता सिंह किर्ती यांनीही कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील बांधकाम तोडण्याच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. हे देवा! हे तर एक प्रकारचं गुंडाराज आहे. अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. “महाराष्ट्रातील या अन्यायाला राष्ट्रपती राजवटीनं उत्तर देता येईल का? चला आपण पुन्हा एकदा राम राज्य प्रस्थापित करुया,” असे ट्विट श्वेता सिंह हिने केले.

त्यामुळे महाविकास आघाडी प्रचंड घाबरली असून तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंगना प्रकरणावर काहीही बोलू नये, असे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*