युवराजांचा अहंकार जपण्यासाठी परीक्षेचे चटावरच श्राध्द, अतुल भातखळकर यांचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेऊन चटावरचं श्राध्द उरकण्याचे नाटक केले जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेऊन चटावरचं श्राध्द उरकण्याचे नाटक केले जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भातखळकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने नाइलाजाने घेतला. परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे यापूर्वी कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले. आता कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणात ठाकरे सरकार कडून ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्याचे काम केले जात आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याकरिता बोलावलेल्या बैठकीनंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या अहवालातील शिफारसी माध्यमांसमोर जाहीर केल्या. यात घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या शिफारसीचा निर्णयच झाला नसल्याची बाब समोर आली असून, कुलगुरूंना देण्यात आलेय पत्रांमध्ये सुद्धा घरबसल्या परीक्षा देण्याचा उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे एकंदरीतच उच्च शिक्षणाचा पूर्ण बट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापायीच चालू आहे. या संदर्भात आपण कुलपती म्हणून राज्यपालांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बाबतीत तक्रार केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यार्थी व कर्मचार्यांचे आरोग्य लक्षात घेऊन समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारावरच परीक्षा पार पाडाव्या अशी मागणीदेखील राज्यपालांकडे केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*