- डेटा चोरून भारताबाहेर पाठविण्यात आल्याच्या तक्रारी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत – चीनमधला तणाव टोकाला चाललेला असताना मोदी सरकारने आक्रमक भूमिका घेत ११८ अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये Baidu, Baidu Express Edition, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading Tencent Weiyun यांचाही समावेश आहे. या सर्व अॅप्सचा चीनशी संबंध आहे.
भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचेही नमूद केले आहे.
आमच्याकडे वेगवेगळे रिपोर्ट, तक्रारी आल्या होत्या. अॅड्रॉइड आयओएसवर उपलब्ध असणारे काही मोबाइल अॅप गैरवापर करत असून बेकायदेशीरपणे युजर्सचा डेटा चोरत होते. हा डेटा भारताबाहेर असणाऱ्या सर्व्हरवर पाठवला जात होता. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. त्यामुळे बंदी घातल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.