मोदी – पुतीन चर्चेनंतर राफेलच्या जोडीला येणार रशियन फायटर जेट्सचे बळ

  •  भारत रशियाकडून घेणार ३३ फायटर जेट; संरक्षण मंत्रालयाती तातडीची मंजूरी
  •  १८,१४८ कोटींच्या खरेदीस मान्यता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनशी संघर्ष सुरू असताना “वॉर गेमचेंजर” ६ राफेल विमाने भारतीय हवाई दलात दाखल होत असतानाच त्यांच्या जोडीला रशियन फायटर जेट्सचे बळही येणार आहे. भारताने आता रशियाकडून ३३ फायटर जेट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३३ लढाऊ विमानांमध्ये खरेदी १२ सुखोई-३०एमकेआयएस आणि २१ मिग-२९ या विमानांचा समावेश असेल. संरक्षण मंत्रालयाने या खरेदी प्रस्तावास तातडीची मंजूरी दिली आहे. याशिवाय सध्या भारताकडे असलेल्या ५९ मिग-२९ लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली. त्यामुळे पुतीन यांना आता २०३६ पर्यंत रशियाचे नेतृत्व करता येणार आहे. त्याबद्दल गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना फोनवर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही तासांमध्ये या संरक्षण प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली. १८ हजार १४८ कोटी रुपयांच्या या खरेदीला मंजुरी मिळाल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या फायटर विमानांबरोबर झालेल्या हवाई संघर्षाच्यावेळी हवाई वर्चस्व किती महत्वाचे आहे ते आपल्या लक्षात आले आहे. भविष्यात पाकिस्ताबरोबर असे संघर्ष पुन्हा होऊ शकतात त्यावेळी आपल्याकडे एफ-१६ पेक्षा सरस विमाने असणे आवश्यक आहे. शिवाय चीनशी सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे येणाऱ्या काळात आपल्याकडे आणखी संरक्षण बळ लागणार आहे. त्या दृष्टीने रशियाशी होणारा हा व्यवहार महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात २७ जुलैला फ्रेंच बनावटीची ६ राफेल फायटर विमाने दाखल होतील. यात रशियाकडून येणाऱ्या ३३ विमानांची भर पडेल. भारताकडे मिग-२९ फायटर विमानांच्या तीन स्क्वाड्रन आहेत. या स्क्वाड्रन पश्चिम सीमेवर तैनात आहेत. नौदलाकडेही मिग-२९ विमाने आहेत. विमानवाहू युद्धजहाज आयएनएस विक्रमादित्यवर ही विमाने तैनात आहेत.

फेब्रुवारी २०१९ मध्ये एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मिग-२९ च्या ताफ्याची पाहणी करण्यासाठी रशियाला गेले होते. त्यावेळी रशियाने दीड वर्षाच्या आत २१ मिग-२९ विमाने देण्याचे आश्वासन दिले होते. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल. मिग २९ ही अत्याधुनिक तंत्रज्ञान, रडारने ही विमाने सुसज्ज असून हवेतच इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे ही विमाने चौथ्या पिढीमध्ये मोडतात. २८५ ते ३०० कोटी रुपये एका विमानाची किंमत असल्याचे बोलले जाते. अतिरिक्त इंधन टाकीने या विमानाची पाच तास उड्डाण करण्याची क्षमता आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*