मंदिर-मशिदी बांधण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारा

  • राम मंदिरासाठी १ कोटी देणगी देणाऱ्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या संकटात मंदिर – मशिदी बांधण्यावर खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा उभारण्यावर खर्च करा, असा टोला मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला. अयोध्येच्या राम मंदिरासाठी शिवसेनेने १ कोटी रूपयांची देणगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्याच महापौरांनी टोला मारला आहे.

पेडणेकर म्हणाल्या, “संपूर्ण जगभरासह भारत देशही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. महाराष्ट्रात मुंबई शहरही या विषाणूच्या विळख्यात सापडलं आहे. मार्च महिन्यापासून शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आला. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे गेल्या ४ महिन्यांत करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. करोना महामारीने, आपल्याला मंदिर-मशिदीच्या निर्माणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सक्षम करणं गरजेचे आहे.”

काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. याबद्दल विचारलं असता पेडणेकर म्हणाल्या, “करोना विषाणूने आपल्या सर्वांना एक महत्वाचा धडा शिकवला आहे. मंदिर-मशीद, चर्च, गुरुद्वारा यांच्या निर्माणावर पैसे खर्च करण्यापेक्षा शहरातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शहरात अजुन रुग्णालयं, नर्सिंग होम उघडली गेली पाहिजेत. धार्मिक स्थळही तितकीच महत्वाची आहेत. पण आरोग्य व्यवस्थेला नेहमी पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.” सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, आयसीयू बेडची कमतरता होती. अनेकदा रुग्णालयात भरती होईपर्यंत रुग्णांची तब्येत बिघडत होती. केंद्रातून आलेलं पथकही शहरातील आरोग्य व्यवस्थेबद्दल समाधानी नव्हतं. पण यानंतर महापालिका आणि राज्य शासनाने तात्काळ पावलं टाकत कोविड जम्बो हॉस्पिटलची उभारणी करण्यापासून सर्व सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिल्याचं पेडणेकर म्हणाल्या.

महापौर या नात्याने किशोरी पेडणेकर गेल्या काही दिवसांत आरोग्य यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे की नाही याचा आढावा घेत होत्या. पेशाने नर्स असलेल्या पेडणेकर यांनी मध्यंतरी रुग्णसेवाही केली. “मी खूप धार्मिक आहे. कोणाचा मृत्यू कधी येतो हे कोणालाही माहिती नसतं. जर माझा मृत्यू करोनामुळे होणार असेल तर तो असाही होईल. तसेच महापौर या नात्याने या शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणं, त्यांची काळजी घेणं हे माझं काम आहे. गेल्या काही दिवसांपासून मी मुंबईतल्या जवळपास प्रत्येक रुग्णालयात जाऊन आयसीयू, पीपीई किट व इतर सोयी-सुविधांचा आढावा घेत आहे.” पेडणेकर यांनी माहिती दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*