भारताच्या सर्वोच्च वर्तुळात “लढाई”, “टक्कर” या शब्दांवर जोर

  • “from passive to active” बदलत्या मानसिकतेची चिन्हे
  • घातक कमांडो फोर्स, इस्रायली बराक क्षेपणास्त्रे तैनाती; चीनविरोधात लष्करी कारवाईची तयारी
  • “दोन्ही देशांतील तणाव वाढू द्यायचा नाही,” या चर्चेच्या नावाखाली आम्ही चीनपुढे नमते घेणार नाही…!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीन सीमेवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सैन्य, युद्धसामग्रीची जमवाजमव यातून भारताने चीनला मोठ्या सैनिकी कारवाईचा सूचक इशारा दिला आहे. सीमेवर इस्रायली बराक क्षेपणास्त्रे आणि घातक फोर्सच्या कमांडोंची तैनातीकडे वाटचाल यातून हा इशारा अधोरेखित होतोय.

चीनशी चर्चा सुरूच राहील, परंतु देशाने आवश्यक तेव्हा लष्करी कारवाईसाठी तयार राहिले पाहिजे, याबाबत केंद्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवर एकमत होत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या अनुषंगाने सर्वोच्च पातळीवर सुरू असलेल्या चर्चेत ‘लढाई’ आणि ‘टक्कर’ या शब्दांचा उल्लेख विशेषत्वाने झाल्याचे खास सूत्रांनी निदर्शनास आणून दिले.

आम्हाला दोन्ही देशांतील तणाव वाढू द्यायचा नाही, परंतु चर्चेच्या नावाखाली आम्ही चीनपुढे नमते घेणार नाही. माघार घेणार नाही, तर त्यांना टक्कर देऊ, असे या चर्चेत सहभागी झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नुसता परिणामांचा विचार करून किंवा घाबरून तुम्हाला पुढे जाणे अशक्य होईल. पण अनावश्यक घाबरण्याचे कारण नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

२० भारतीय जवानांचा बळी घेतल्यानंतर चीनचा एकूण प्रतिसाद पाहता दोन्ही देशांतील तणाव निवळण्यासाठी चीन प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. किंबहुना, चीनच्या एकूण वर्तनाबद्दल वरिष्ठ पातळीवर प्रचंड अस्वस्थता आणि संताप आहे, हे भारतीय नेतृत्व अशा भूमिकेपर्यंत येण्यामागील मुख्य कारण असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

‘‘त्यांनी आमच्या जवानांची हत्या केली आहे. आम्ही त्यांच्याकडून सांत्वन किंवा पश्चातापाची अपेक्षा करीत नसतानाही त्यांनी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीस तुमचे जवानच जबाबदार असल्याची ओरड केली. हे पाहता तणाव कमी करण्याची चिन्हे चीनच्या वर्तनात दिसत नाहीत’’, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. ते बोलतात त्याप्रमाणे वागत नाहीत वर भारताचीच चूक असल्याचे चीनने म्हटले आहे, अशी पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली. चीनची ही दादागिरी मोडायची यावर एकमत तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*