भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू; मस्तवाल चीनची धमकी

  • “शक्तिशाली चीनचा सामना करताना अमेरिकेतून पाठिंबा मिळेला या भ्रमात राहू नका”; ग्लोबल टाइम्सचा दावा

वृत्तसंस्था

बीजिंग : मस्तवाल चीनची हेकडी कायम असून भारताची १९६२ पेक्षा मोठी हानी करू, अशी धमकी चीनने ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून दिली आहे. पँगाँग लेक परिसरातून चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी हुसकावून लावल्यामुळे चीन खवळला आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच पुन्हा एकदा चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. भारतीय लष्कराने यासंबंधी माहिती दिली आहे. चीनने भारताला स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल तर भूतकाळात झाले नाही इतके मोठे लष्करी नुकसान करू, अशी धमकी दिली आहे. सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने भारताला धमकावले आहे.

भारताने सोमवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळल्यानंतर त्याच दिवशी चिनी सैन्यांच्या प्रवक्त्याकडून भारताने बिजिंगमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करत अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडला असल्याचा आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सैन्यांनी नियंत्रण रेषा पार केली नसल्याचाही दावा केला आहे.

उलट चीनने ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये भारतानेच सर्वात प्रथम घुसखोरी प्रयत्न केला आणि संघर्षासही सुरुवात केली असा दावा केला आहे. शक्तिशाली चीनचा सामना करताना अमिरिकेतून याप्रकरणी काही पाठिंबा मिळेला या भ्रमात राहू नका, असेही ग्लोबल टाइम्सने लिहिले. भारताला संघर्ष करण्याची इच्छा असेल तर चीनकडे अधिक साधने आणि क्षमता आहे. जर भारताला लष्करी सामर्थ्य दाखवायचे असेल तर पीपल्स लिबरेशन आर्मी भारतीय लष्कराला १९६२ मध्ये झाले त्यापेक्षाही जास्त नुकसान सहन करण्यास भाग पाडेल अशी धमकी चीनने दिली आहे.

याआधी जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यावेळी भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनचंही मोठं नुकसान झालं होतं. यानंतर चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी सैन्य माघार घेण्यास सहमती दर्शवली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*