बंगळूरू हिंसाचारातील जमावाने काँग्रेस आमदाराचे घर जाळून ३ कोटींचा ऐवज लुटल्याची तक्रार

  • काँग्रेस नगरसेविकेच्या पतीला अटक; आमदार मूर्ती यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा; एफआयआर दाखल

वृत्तसंस्था

बंगळुरू : बंगळूरूमध्ये उसळलेल्या हिंसाचारात कर्नाटकचे काँग्रेस आमदार अखंडा श्रीनिवास मूर्ती यांचे डी. जे. हळ्ळीतील घर दंगलखोरांनी पेटवून देऊन त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ कोटी रुपयांचा ऐवजही त्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमधील तक्रारीनुसार, २०००-३००० लोकांनी आमदार मूर्ती यांचे घर आणि खासगी वाहनांसह इतर मालमत्ता ११ ऑगस्ट रोजी पेटवून दिली. मात्र, या हल्ल्यानंतर आमदारांनी तीन दिवसांनंतर ही तक्रार दाखल केली आहे. शहरात जमावबंदीचं १४४ कलम लागू केल्याने त्याचबरोबर सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने हा उशीर झाल्याचे आमदारांनी म्हटले आहे.

माध्यामांतील वृत्तांनुसार, काँग्रेस पक्षाचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचं मूर्ती यांनी म्हटले आहे. दंगलखोरांनी आमदार मूर्ती यांचे घर टार्गेट केले कारण त्यांचा भाचा पी. नवीन यांनी फेसबुकवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतरच ११ ऑगस्ट रोजी हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या हिंसाचारामध्ये ३५ आणखी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एकूण अटक आरोपींची संख्या ३४० वर पोहोचली आहे. यामध्ये काँग्रेसच्या नगरसेविका इर्शाद बेगम यांचे पती कलीम पाशा यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे निकटवर्तीय आणि कर्नाटकचे माजी मंत्री के. जे. जॉर्ज यांच्याशी पाशा यांचे जवळचे संबंध आहेत. तसेच त्यांचा एसडीपीआय या संघटनेशी संबंध आहे. या हिंसाचारानंतर राज्य सरकारनं या भागात १८ ऑगस्टपर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*