पंतप्रधानांनी “मन की बात”मधून गौरविलेले कोण हे कामेगौडा?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या “मन की बात”मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “केरे कामेगौडा” या ज्येष्ठ व्यक्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला… आणि हे कामेगौडा कोण? थोडी उत्सुकता जागी झाली जाणून घेण्याची नक्की कोण आहेत हे अवलिया?

बिहारच्या दशरथ मांझीने पहाड खोदून मार्ग तयार केला होता. त्याच्यावर एक हिंदी चित्रपटही येऊन गेला. तो देशभर गाजला. त्याला पुरस्कारही मिळाले. पण असे शेकडो – हजारो “मांझी” भारतभर आहेत. या पैकी एक कामेगौडा. एखाद्या चित्रपटाला साजेशी़च कामगिरी कामेगौडा यांची आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले या ८५ वर्षांच्या अवलियाने. कामेगौडा यांचे घर कर्नाटक येथील मांड्या गावातील डासनाडोड्डीमध्ये आहे. ते मेंढपाळ असून कुंदिनीबेट्टा गावाजवळ मेंढ्या चारतात.

४० वर्षांपूर्वी ते जेव्हा मेंढ्या घेऊन डोंगरावर चरायला जात, तेव्हा तेथे जनावरांना प्यायला पाणी नसल्याचे त्यांना लक्षात आले. पहाडी जागा असल्याने तेथे पावसाचं पाणी जमा होत नसे. तेव्हा त्यांच्या डोक्यात तलाव खणण्याची कल्पना आली. सुरवातीला ते काठीने खड्डा खोदत. मात्र ते त्यांना कठीण जाऊ लागलं. म्हणून त्यांनी काही अवजार विकत घेण्याचं ठरवलं.

आता मेंढपाळाकडे कुठले आले इतके पैसे? मग त्यांनी काही मेंढ्या विकून अवजार विकत घेतले आणि खड्डे खोदायचे काम सुरू ठेवले. पावसाळा आला, खड्ड्यांच् रूपांतर तलावात झालं. जनावरांना पाणी मिळू लागलं तसा कामगौडा यांचा उत्साह वाढू लागला.

लोकांच्या टिंगल टवाळीकडे लक्ष न देता त्यांनी नव्या जोमाने त्यांनी अजून काही तलाव खोदले. त्यांनी २०१७ पर्यंत केवळ सहा तलाव बनवले होते. कामेगौडांची जिद्द पाहून शेकडो हात पुढे आले. गेल्या एक-दीड वर्षात लोकसहभागामुळे तलावांची संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली. त्यांनी बनवलेले १४ तलाव हे एकमेकांशी जोडलेले आहेत, हे विशेष..!!

तसेच त्यांनी डोंगरावर जवळपास २००० वडाची झाडे देखील लावली आहेत. त्यांना या कार्यासाठी अनेक बक्षिसे मिळाली आणि जे पैसे मिळाले ते त्यांनी पुन्हा तलावांच्या निर्मितीसाठी वापरले.

पंतप्रधान मोदींनी या कामेगौडांची दखल “मन की बात” मध्ये घेतल्याने ते देशाला माहिती झाले. आपल्या ही आजूबाजूला असे अनेक दुर्लक्षित मांझी, कामेगौडा काम करत असतात, त्या सर्वांच्या कार्यास समाजाने हातभार लावला पाहिजे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*