निधी वाटपावरून वाद, शिवसेनेने कॉंग्रेसला अजित पवारांवर सोडले

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. संपूर्ण मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवार डोईजड होऊ लागल्याने शिवसेनेने निधीवाटपाच्या प्रश्नावरून नाराज असलेल्या कॉंग्रेसला अजित पवारांवर सोडले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. संपूर्ण मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात. मात्र, राष्ट्रवादी आणि अजित पवार डोईजड होऊ लागल्याने शिवसेनेने निधीवाटपाच्या प्रश्नावरून नाराज असलेल्या कॉंग्रेसला अजित पवारांवर सोडले आहे. याबाबत अजित पवार यांनाच विचारा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

विकास निधीचे समान वितरण होत नसून निधी वाटपात पक्षपात होत आहे. सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप मिळते. त्यामुळे विकास निधीवर ‘राष्ट्रवादी’ने डल्ला मारला असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही, असे म्हणत अजित पवारच त्याला जबाबदार असल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. त्याचबरोबर आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या कॉंग्रेसच्या आमदारांचे कान सोनिया आणि राहूल गांधी यांचे नाव घेऊन पकडले आहेत.

काँग्रेसचे आमदार आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसणार असतील तर ज्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल, असे म्हटले आहे.

“देशाची स्थिती तशी बरी नाही. खुद्द राष्ट्रीय काँगेस पक्षात अनेक कारणांनी अस्थिरता व अस्वस्थता आहे. संसदीय लोकशाही व्यवस्थेत सक्रिय विरोधी पक्षाची तितकीच गरज असते. काँगेसने अशा मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी अशी मागणी होत असताना सत्ताधार्यांना प्रश्न विचारण्याऐवजी काँगेसचे आमदार स्वत:च सहभागी असलेल्या सरकारविरोधात उपोषणाला बसत आहेत.

ही लोकशाही वगैरे आहे, पण त्यामुळे ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल,” असे बोल ‘सामना’तून कॉंग्रेसला ऐकवण्यात आले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*