नकोसा पराक्रम..! दोन लाखाचा टप्पा ओलांडणारं पहिलं राज्य अन जगातला पंधरावा ‘देश’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चायनीज व्हायरसने बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बरे असले तरी गेल्या चार पाच दिवसांपासून नव्या रूग्णांच्या संख्येमध्ये होत असलेल्या जबरदस्त वाढीने महाराष्ट्राने दोन लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. हा पराक्रम करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. जागतिक विचार केला तर महाराष्ट्राचा थेट पंधरावा क्रमांक लागतो आणि भारताचा पाचवा. अजूनही हाताबाहेरच असलेल्या परिस्थितीने उद्धव ठाकरे सरकारवरील दबाव आणखी वाढतो आहे.

शनिवारी उलटलेल्या २४ तासामध्ये राज्यात ७०७४ नवे रुग्ण आढळले. हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आज २ लाख ६४ इतका झाला. त्यात सध्या प्रत्यक्षात ८३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दररोज  नवे उच्चांक नोंदवले जात आहेत. आज करोनाच्या आणखी २९५ बळींची नोंद झाली तर त्याचवेळी ७०७४ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,०८,०८२  रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०२ % इतके झाले आहे.

आज राज्यात ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू त्याआधीच्या कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के ) नमुने  पॉझिटिव्ह आले आहेत.

मात्र, १९ जून ते २ जुलै हा कालावधी मोजला तर नमुन्यांच्या तुलनेत पॅझिटिव्ह रूग्णांची संख्या तब्बल २१.८० टक्के आहे. हे प्रमाण देशात दुसरया क्रमाकाचे आहे. पहिल्या क्रमांकावर तेलंगण (२५.३१ टक्के) आहे. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत राज्यात एकूण मृत्यूंची संख्या ८६७१ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील असून हे मृत्यू मुंबई मनपा-६८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-४, जळगाव-३, जळगाव मनपा-४, पुणे-१, पुणे मनपा-७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-४, सोलापूर मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-३, लातूर मनपा-१, अकोला-२, अकोला मनपा-१, यवतमाळ-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*