नकली निधर्मी नेत्यांमध्ये घुसला “रामबाण”; प्रियांका – ओवैसींमध्ये जुंपले घमासान…!!


“तुम्ही लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या काँग्रेसचाही हात; भूमिपूजनाच्या ट्विटवरून प्रियांका गांधींना ओवैसींचा टोला


वृत्तसंस्था

हैदराबाद : नकली निधर्मींमध्ये आज “रामबाण” घुसला. प्रियांका गांधींनी रामाच्या नावाचे ट्विट करताच खासदार असदुद्दीन ओवैसी त्यांच्यावर घसरले. राम जन्मभूमी मंदिराला प्रियांकांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताच ओवैसींनी प्रतिट्विट करून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.

एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशीद प्रकरणावरुन आता थेट काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सुनावले आहे. “लाजू नका, आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या पक्षाने जी भूमिका बजावली त्याचा अभिमान बाळगा असा,” असा टोला ओवैसी यांनी लगावला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विटवरुन राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात एक पत्रक ट्विटवरुन पोस्ट केले. यामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचे मंदिर उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव आणि संस्कृतिक एकतेचे दर्शन घडवणारा असेल अशी कॅप्शन देत त्यांनी हे पत्रक पोस्ट केलं आहे. या पत्रकामध्ये प्रियंका यांनी, “रामायणाच्या माध्यमातून आपल्याला धर्म, कर्तव्याबद्दलची निष्ठा, प्रेम, त्याग, पराक्रम, सेवाभाव यासारख्या अनेक गोष्टींची शिकवण मिळते.

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणपासून उत्तरेपर्यंत रामकथा सर्वांना प्रेरणा देत आली आहे. प्रभू रामचंद्र हे सर्वांचे असून त्यांना सर्वांचे कल्याण अपेक्षित आहे. त्यामुळेच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत,” असं म्हटलं आहे. याच पत्रकात त्यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

प्रियांका यांच्या याच ट्विटवरून ओवैसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “आनंद आहे की ते (काँग्रेस) आता दिखावा करत नाहीय. जर त्यांना प्रखर हिंदुत्वावाद्यांची बाजू घ्यायची असेल तर आमची काहीच हरकत नाही. मात्र ते करताना ही बंधुभावासंदर्भातील उथळ वक्तव्य का करावीत? (तुम्ही) लाजू नका, कृपया आमची बाबरी मशीद पाडण्यामध्ये तुमच्या पक्षाने जी भूमिका बजावली त्याचा अभिमान बाळगा,” असे खोचक ट्विट ओवैसी यांनी केले आहे.

मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची घोषणा आठवड्याभरापूर्वी करण्यात आली त्यावेळीही ओवेसी यांनी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे हे संविधानाच्या शपथेच्या विरोधात असल्याची टीका केली होती. “पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत बाबरी मशीद उभी होती. परंतु काही गुन्हेगारांच्या गटाने १९९२ मध्ये ती पाडली हे आम्ही विसरणार नाही,” असं ओवैसी म्हणाले होते.

भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसंदर्भातील एका चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वीच मी जिवंत असेपर्यंत अयोध्या हा मुद्दा सोडणार नाही असंही म्हटलं होतं “कायदेशीरदृष्ट्या सर्वात वर असलेल्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. परंतु, मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही. मी माझ्या कुटुंबाला, माझ्या लोकांना आणि भारतातील लोकांनाही, ज्या बहुसंख्य लोकांचा न्यायावर विश्वास आहे. त्यांना सांगेल की, तिथे एक मशीद होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ती पाडली गेली. जर मशीद पाडली गेली नसती, तर हा कार्यक्रम (राम मंदिर भूमिपूजन) आयोजित करताच आला नसता,” अशी टीका ओवैसी यांनी केली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती