दूधाला भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी दुग्धविकास मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, राजू शेट्टी यांंची मागणी

दुधाला भाव मिळाला नाही म्हणून राहुरी येथील रेवनाथ काळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी दुग्धविकास मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दुधाला भाव मिळाला नाही म्हणून राहुरी येथील रेवनाथ काळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी दुग्धविकास मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख ११ आयोजक व अन्य ४० ते ५० जणांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत, आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणार.

‘दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही पण, एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं बोललं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा होते, हे दुर्दैवी आहे असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे.

उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कोणाला दया आली नाही. दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही, असे शेट्टी म्हणाले.

परंतु, परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*