ठाकरे-पवार सरकारच्या प्रतिज्ञापत्राच्या विरोधात रोहित पवारांची भूमिका

  • मंदिरे आणि प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी केली आहे. ट्विटरवरून त्यांनी ही मागणी केली आहे. राज्य सरकारने पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केले असतानाच रोहित यांनी ही मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरे आणि धार्मिस्थळे सुरू करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रे सादर करून मंदिरे खुली करता येणार नसल्याचे म्हटले असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*