- परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ‘देव’ झाले फडणवीस; गृहमंत्री अमित शहांनी दिला प्रतिसाद
- महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यांनी बस, खासगी वाहतूक, आरोग्य सुविधा पुरविल्या विद्यार्थ्यांसाठी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जेईई, नीट परीक्षांसाठी विद्यार्थी हा प्रवास करताना त्यांना इतर कुठलीही अडचण जाऊ नये, म्हणून विद्यार्थांच्या प्रवेश पत्रालाच रेल्वेचा पास समजून त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात केंद्र सरकारने पुढाकार घेतला. रेल्वे मंत्रालयाने तसे आदेश निर्गमित करणे गरजेचे आहे, असे पत्र देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले होते. त्यांनी ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद दिला.
परंतु, ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्रात एसटी, रिक्षा किंवा खासगी वाहतूकीची सोय विद्यार्थ्यांसाठी अद्याप उपलब्ध करवून दिलेली नाही. तेलंगण, तमिळनाडू, उत्तर प्रदेशात महापालिकांच्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करवून देण्यात आल्या. तेलंगणात वैद्यकीय सुविधाही पुरविल्या. अन्य राज्य सरकारे स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांसाठी सुविधा देत आहेत. पण मुंबई, पुण्यासह विविध महापालिका क्षेत्रात बस सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करवून देणे शक्य असताना अद्याप तशी काही हालचाल दिसत नाही. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना अडचण येऊ देणार नाही, असे विधान केले पण सोयींबद्दल अवाक्षरही काढले नाही.
या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या प्रवेशपत्रालाच रेल्वेचा पास समजून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ रेल्वे मंत्रालयाला तशा सूचना दिल्या. त्यामुळे नीट-जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
फडणवीस यांनी कालच आपल्या मागणीचे पत्र अमित शहा यांना ट्विट केले. त्यांच्या ट्विटला गृहमंत्र्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशात नीट-जेईई परीक्षा होऊ घातली आहे. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेत केवळ अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी दिली आहे. विद्यार्थहिताची मागणी तत्काळ पूर्ण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे आणि योग्य वेळी योग्य सूविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.
देशभरात नीट-जेईई परीक्षेला सुरुवात झाली असून, मुंबई महापालिकेच्या उपनगरी सेवांमध्ये योग्य ती वाढ करावी आणि संभाव्य उमेदवारांना या परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्रांच्या आधारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यानुसार १ सप्टेंबर २०२० पासून मुंबई आणि मुंबई उपनगरी सेवा योग्यरित्या वाढविण्यासाठी मध्यवर्ती व पश्चिम रेल्वेने कार्यवाही करावी, अशा सूचना केंद्रातून देण्यात आल्या आहेत.
वाहतूक व्यवस्था अद्यापही पूर्ण सुरू नाही
देशात नीट आणि जेईई परीक्षा सुरू झाल्या असताना सततच्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुरू झालेली नाही. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, आदी महापालिकांनी बस सेवा उपलब्ध करवून देण्यात काहीच हरकत नाही. ग्रामीण भागात विशेषत: तालुक्यांच्या ठिकाणी एसटी सेवा, वडाप सेवा उपलब्ध केली पाहिजे. परंतु, ठाकरे – पवार सरकार त्याबाबत अद्याप हललेले दिसत नाही.