जितनराम मांझी अखेर एनडीएमध्ये, महागठबंधनला धक्का

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) – काँग्रेसप्रणित महाआघाडीस सोडचिठ्ठी देणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे (हम) अध्यक्ष जितनराम मांझी हे गुरूवारी एनडीएमध्ये सामिल होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाआघाडी आता धोक्यात आली आहे, तर एनडीएचे बळ वाढले आहे. मांझी यांच्यानंतर आता नितीश कुमार यांचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ राजकारणी शरद यादवदेखील पुन्हा एकदा जनता जनता दल युनायटेडमध्ये ‘घरवापसी’ करण्यास सिद्ध होत आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांची बाजू भक्कम होण्यास सुरूवात झाली आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक वर्षअखेरीस होणार आहे. त्यासाठी आता सर्वच पक्ष तयारीस लागले आहे. यावेळच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्ने अनेक प्रकारचे निर्बंध राजकीय पक्षांवर आहेत. त्यातच आता राजद – काँग्रेसप्रणित महागठबंधनला फाटाफुटीचे ग्रहण लागण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अगोदरच कमकुवत असलेल्या महागठबंधनला नितीश कुमारांचा सामना करता येणे आतापासूनच अवघड असल्याचे दिसत आहेत.

जितनराम मांझी यांनी काही दिवसांपूर्वीच महागठबंधनला सोडचिठ्ठी दिली होती. त्यासाठी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्ष आणि महागठबंधन सांभाळणे त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यादव यांच्या हटवादी स्वभावाचे कारण दिले होते. “तेजस्वी यादव यांचा स्वभाव अतिशय हट्टी आहे. अतिशय मनमानी पद्धतीने वागणारे तेजस्वी कोणाही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही. त्यामुळे महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे”. असे मांझी यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीविषयी सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर आता गुरूवारी ते एनडीएमध्ये प्रवेश करणार आहेत. मांझी यांच्या एनडीए प्रवेशामध्ये नितीश कुमार यांच्या मुत्सद्दीपणाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. कारण महागठबंधनमध्ये समन्वय समितीची स्थापना करावी, जागावाटपाचा तिढा सोडवावा अशी मागण मांझी अनेक दिवसांपासून करीत होते.

मात्र, तेजस्वी आपल्या स्वभावास अनुसरून त्याकडे दुर्लक्ष करीत होते. तेव्हापासून मांझी यांच्या नाराजीकडे नितीश कुमारांचे विशेष लक्ष होते. त्याचप्रमाणे मांझी यांच्याकडेदेखील महागठबंधन सोडल्यानंतर नितीश कुमारांकडे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मांझी आता एनडीएमध्ये प्रवेश करीत आहेत.

एनडीला मिळणार दलित मतदारांचा पाठिंबा

जितनराम मांजी यांच्या एनडीएसोबत जाण्यामुळे नितीश कुमार यांना दलित समुदायाचा एकमुखी पाठिंबा मिळणे शक्य होणार आहे. बिहारमध्ये दलित आणि महादलित समुदायाचे मिळून जवळपास १६ टक्के मतदार आहेत. त्यापैकी जवळपास ५ टक्के मतदार हे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षासोबत असल्याचा दावा आहे. तर मांझी प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुसाहार समुदायाची मतांची टक्केवारी सुमारे साडेपाच टक्के आहे. त्यामुळे मांझी एनडीएमध्ये गेल्यामुळे नितीश कुमार यांना अतिरिक्त पाच टक्के मतांचा फायदा होणार आहे.

बिहार विधानसभेत अनुसूचित जातींसाठी ३८ जागा राखीव आहेत. गतवेळच्या म्हणजे २०१५ सालच्या विधानसभा निवडणूकीत सर्वाधित १४ जागांवर राजदने विजय मिळविला होता. त्याखालोखाल जदयु १०, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ५ आणि उर्वरित ४ जागांवर अन्य उमेदवार विजयी झाले होते. उर्वरित जागांपैकी १३ जागा रविदास समुदायाकडे तर ११ जागांवर पासवान समुदायातील उमेदवार विजयी झाले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*