मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी शी जिंगपिंग सरकारचे अघोरी उपाय
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन / बीजिंग : भारतात दहशतवाद माजवणाऱ्या पाकिस्तानला पाठिशी घालणाऱ्या चीनने स्वत:च्या देशातील उइगर मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांकांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीच्या नसबंदीसारखे आणि गर्भपातासारखे अघोरी उपाय केले आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर चीनची भूमिका दुटप्पी आहे. कारण उइगर मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अघोरी उपायोजना करणाऱ्या चीनने हान बहुसंख्यांकांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. भारतातल्या मुसलमानांबद्दल गळे काढून आदळ आपट करणारा पाकिस्तान उइगर मुस्लिमांवरील खऱ्या अत्याचारांवर मात्र मूग गिळून गप्प आहे.
सरकारी आकडे, राज्याची कागदपत्रे आणि डिटेंशन सेंटरममध्ये राहिलेल्या ३० जणांबरोबर बोलल्यानंतर उइगर आणि अन्य अल्पसंख्यांकांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी चीनकडून सक्तीने अघोरी उपायोजना केल्या जात असल्याचे समोर आले आहे. शिनजियांग प्रांतामध्ये मागच्या चार वर्षांपासून चीनकडून हे सर्व प्रकार पद्धतशीरपणे सुरू आहेत. असोसिएटेड प्रेसने कागदपत्रांची तपासणी तसेच तिथल्या डिटेंशन सेंटरमधल्या नागरिकांशी बोलल्यानंतर ही बातमी दिली आहे.
चीनमधल्या सरकारी यंत्रणेकडून तिथल्या अल्पसंख्यांक महिलांच्या गर्भधारणेवर लक्ष ठेवले जाते. शेकडो हजारो जणांची नसबंदी, महिलांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात नसबंदी कमी झाली असली तरी शिनजियांगमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जास्त मुले असणाऱ्यांना चीनी सरकार डिटेंशन सेंटरमध्ये पाठवते. तीन किंवा चार मुले असणारे पालक दंडाची मोठी रक्कम भरत नाहीत, तो पर्यंत त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये डांबले जाते. मुलांना लपवून तर ठेवले नाही ना? हे तपासण्यासाठी पोलिस घरांवर छापे घालतात.