चर्चेच्या टेबलावर माघार; पँगाँगमध्ये हेलिपॅड; चीन नाही सुधारणार

  •  दक्षिण किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव
  •  चीनने बांधकाम बंद करावे, भारताचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली / बीजिंग : पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमधील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे चीन चर्चेच्या टेबलवर सगळ्या गोष्टी कबूल करतो पण प्रत्यक्षात हेकेखोरी थांबवत नाही. नियंत्रण रेषेवरील बांधकामे थांबवावीत, असे भारताने निक्षून सांगूनही चीन ही बांधकामे थांबवायला तयार नाही. सध्यातरी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये कुठलीही चर्चा होणार नाही तसेच चीनने पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे.

ज्यावर मोठ्या प्रमाणात वाद आहे, त्या फिंगर फोरवर चीनने हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणी सुरू केली आहे. पँगाँग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चिनी सैन्य तुकडयांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर फोरवर दावा सांगत आहे. त्यादृष्टीने त्यांनी तिथे सुरू केलेली तयारी निश्चित धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरला आहे. यापू्र्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे.

“पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केलीय हे बरोबर आहे. मागच्या आठ आठवडयात त्यांनी फिंगर क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामे केली आहेत, त्यात हेलिपॅड आणखी एक नवीन काम आहे” एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

‘आम्ही माघार घेणार नाही तसेच परिस्थिती जैसे थे तशी कायम करणार नाही हाच चीनच्या कृतीमधून अर्थ निघतो’ असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच ‘पँगाँग टीएसओ क्षेत्राबद्दल चर्चा करण्यात त्यांना रस नाहीय’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

चीनने बांधकाम बंद करावे नाहीतर…भारताचा इशारा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी चीनने घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असा इशारा भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी दिला आहे.

सैन्य माघारी घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर माघारी जाण्याच्या जबाबदारीचे भान चीनने ठेवावे असे सांगून ते म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून नवीन बांधकामे करण्याचे चीनने आता बंद करावे.

मिस्री म्हणाले, “भारतीय सैन्याच्या नेहमीच्या गस्तीच्या कामात चीनची सैन्यदले नेहमी अडथळे आणतात. गलवान भागातील प्रदेशावर चीनने केलेला दावा समर्थनीय नाही. भारत सरकारने वेळोवेळी हे सांगूनही फरक पडत नसल्याने परिस्थिती चिघळत असून असे अतिरंजित दावे करून परिस्थिती सुधारण्यास मदत होणार नाही.”

चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मॅक्सार या स्पेस टेक्नोलॉजी कंपनीने २२ जून रोजी हे फोटो काढले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने बांधकाम केल्याचे यातून स्पष्ट दिसते. १७ जून ते २२ जून या कालावधीत हे बांधकाम करण्यात आले आहे. कारण प्लॅनेट लॅबच्या १६ जूनच्या फोटोमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणी असे कुठलेही बांधकाम दिसले नव्हते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*