- ईडीच्या आठ तासांच्या चौकशीनंतर अहमद पटेल म्हणाले, “मोदी -शहांचे पाहुणे येऊन गेले”
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भष्टाचाराच्या दलदलीत अडकलेले काँग्रेसचे बडे मासे ईडीच्या जाळ्यात सापडताहेत. पण मोदी – शहांचा “पाहुणचार” त्यांना कमी पडतोय. पाहुणचारात मोदी – शहा त्यांना जे खाऊ घालताहेता ना… त्यांना ते कमी पडतेय. अजून महेमान नवाजी़, खातिरदारीची काँग्रेसवाल्यांची अपेक्षा दिसतीय.
पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ सोनिया गांधींचे निकटवर्ती अहमद पटेल यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरी जाऊन आठ तास चौकशी केल्यानंतर अहमद पटेल काय म्हणालेत?, “मोदी – शहांचे पाहुणे घरी येऊन गेले. माझी चौकशी केली. पण मी काही केलेच नाहीए. त्यामुळे त्यांच्या हाती काही लागले नाही.”
याचा अर्थच मोदींचा पाहुणाचार, मेहमान नवाजी, खातिरदारी कमी पडल्याचे दिसतेय. अन्यथा भष्टाचाराच्या दलदली रूतल्यानंतर देखील अशी खिल्ली उडवणारी भाषा अहमद पटेलांनी मोदी – शहांबद्दल वापरली नसती. चिदंबरम देखील मोदी – शहांचा पाहुणाचार घेऊन आलेत. बाहेर आल्यावर तेही काही-बाही बोलले पण एवढी मस्तीखोरी नव्हती त्यांच्या विधानांमध्ये. बरोबर आहे, कदाचित १० जनपथच्या अतिजवळकीचा अहमद पटेलांवर अधिक गहिरा परिणाम झाला असावा. त्यातूनच अशी मस्तीखोरी येत असते आणि अंगात मुरत असते.
संदेसरा ग्रुपच्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीच्या १४,५०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय ईडीच्या तीन सदस्यांच्या पथकाने अहमद पटेल यांच्या सेंट्रल दिल्लीमधील मदर तेरेसा क्रेसेंट या घरी जाऊन मनी लाँड्रिगच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे अहमद पटेलांचा जबाब घेतला. यापूर्वी ईडीने दोनवेळा पटेलांना समन्स बजावले होते. मात्र पटेल हे गुजरातमधून राज्यसभेचे खासदार असून ज्येष्ठ नागरिक असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. तशी पटेलांची विनंती ईडीने मान्य केली होती. मात्र, चौकशी करण्यासाठी घरी तपास अधिकारी पाठवू, असे ईडीने पटेल यांना सांगितले होते.
आधी अहमद पटेल यांचा मुलगा फैजल आणि जावई इरफान सिद्दीकी यांच्या चौकशीनंतर ईडीने आता खुद्द अहमद पटेलांची चौकशी केल्याने पटेलांसह काँग्रेसपुढच्या अडचणी वाढणार असल्याचेही बोलले जात आहे.
काय आहे स्टर्लिंग बायोटेक प्रकरण?
गुजरातमधील बडोदा येथील संदेसरा घराणे मोठे उद्योजक आहेत. या कंपनीचे मालक नितीन, दिप्ती संदेसरा यांनी १४,५०० कोटी रूपयांचे कर्ज बँकाकडून घेतले आहे. हे कर्ज घेताना त्यांनी बँकांना चुकीची माहिती देऊन हेराफेरी केली. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संदेसरा बंधू देश सोडून पळून गेले. सरकारने पळपुटे म्हणून जाहीरही केले आहे.