कोविड अटी-शर्तींसह वैष्णोदेवी मंदिर खुले; आजपासून दर्शन

  • दर्शनासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक

वृत्तसंस्था

जम्मू : कोरोना काळात सामान्य भक्तांसाठी जवळपास ६ महिन्यांपासून बंद असलेले वैष्णोदेवी मंदिर आज १६ ऑगस्ट, रविवारपासून सर्व भक्तांसाठी खुले झाले आहे. परंतु, यासाठी प्रशासनाने कोविड अटी – शर्ती लावल्या आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये दररोज २ हजार भक्त देवीचे दर्शन घेऊ शकतील. कोरोनापूर्वी याठिकाणी एक दिवसात ५० ते ६० हजार भक्त देवीचे दर्शन घेत होते.

 

वैष्णोदेवी मंदिर जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर ५२०० फूट उंचीवर असून जम्मूपासून ६१ तर कटारापासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. वैष्णोदेवीच्या तीन पिंडींमध्ये देवी काली, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी गुहेमध्ये विराजित आहेत. यात्रा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात १९०० भक्त जम्मू-काश्मीरमधील आणि इतर राज्यातील १०० भक्त दर्शन घेऊ शकतील.

वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रा सुरू होत आहे. दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. सर्व भक्तांनी फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करणे अनिवार्य आहे. मास्क, सोशल, डिस्टेंसिंग आणि सॅनिटायझेशनकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

 

यात्रेकरूंची थर्मल स्क्रिनींगही केली जाईल. १० वर्षांखालील मुलांना, गर्भवती महिलांना, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना दर्शनाची परवानगी नाही. यासोबतच ज्या लोकांना कोविड-19 शी संबंधित कोणतेही लक्षण आढळून आल्यास त्यांनाही दर्शनाची परवानगी नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*