- नाशिक महापालिका, सिडको, भूजल सर्वेक्षण मध्येही बदल्या
वृत्तसंस्था
नागपूर : नागपूर महापालिकेचे बहुचर्चित आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने बदली केली असून त्याच्या जागी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपची सत्ता असलेल्या या महापालिकेत त्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नेहमीप्रमाणे जुळले नाही. त्यामुळे सहा महिन्यांच्या आतच त्यांना नागपूर सोडण्याची वेळ आलेली आहे.
मुंढे यांना कालच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे घरीच क्वारंटाईन आहेत. मुंढे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नवीन नियुक्ती मिळाली आहे. मुंढे यांची दहा वर्षांच्या कालावधीत १४ वी बदली आहे.
राज्य सरकराने इतरही काही बदल्या केल्या असून कैलास जाधव यांना नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली आहे. एस. एस. पाटील यांना सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्त आणि डाॅ. एन. बी. गिते यांना महावितरणे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. सी. के. डांगे यांची बदली संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे येथे करण्यात आली आहे. मुंढे यांची बदली अपेक्षित नव्हती.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पण त्यांच्या कामावर खूष होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कामाला पाठिंबा दिला होता. नागपूर स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यारून नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुंढे यांची तक्रार थेट केंद्रीय नगरविकास विभागाकडे केली होती. कोरोनाची स्थिती हाताळण्यावरून मुंढे यांचे स्थानिक नेतृत्त्वाशी खटके उडत होते. मात्र सामान्य जनता त्यांच्यावर खूष होती. तरीही त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.