कंपाऊंडरकडून “औषध घेणाऱ्या” राऊतांसाठी आज “डॉक्टर देवदूत”

  • डॉक्टरांच्या संघटनांनी हेकडी काढताच संजय राऊत नरमले; म्हणाले, ,”डॉक्टर तर देवदूत, त्यांचा अपमान केलेला नाही”
  •  WHO आता राजकीय संघटना झाली आहे

वृत्तसंस्था

मुंबई : कालपर्यंत कंपाऊंडरकडून “औषधे” घेणाऱ्या खासदार संजय राऊतांसाठी आज डॉक्टर एकदम देवदूत ठरले…!! हा चमत्कार झाला कसा? इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डसारख्या डॉक्टरांच्या संघटनांनी हेकडी काढताच संजय राऊत नरमले आणि डॉक्टर तर देवदूत असतात, असे म्हणून मोकळे झाले. मात्र, जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली असल्याची टीका संजय राऊत यांनी कायम ठेवली.

डॉक्टरांच्या विविध संघटनांनी संजय राऊतांच्या कंपाऊंडरी विधानाचा निषेध करताच राऊतांना नमते घ्यावे लागले. मखलाशी करताना कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात, असं म्हणत संजय राऊत यांनी  डॉक्टर तर देवदूतासारखे असतात, असे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. मी डॉक्टरांचा अपमान केलेला नाही असं म्हटलं.

राऊत म्हणाले, “करोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे.”

“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” अशी मखलाशी संजय राऊत यांनी केली.

“जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांना फटाकरले आहे. संबंधही तोडले आहेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. करोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“रशियानेसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेविरोधात विधानं केली आहेत. पण मग तुम्ही ट्रम्प आणि रशियाचाही निषेध करणार का ? ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील डॉक्टर संपावर गेलेते का ? पुतीन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का ? आज प्रत्येक देश आणि राज्य आपापली परिस्थिती हाताळत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं,” असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*