कंगनाला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेनेने करू नये, तिला मुंबईत राहण्याचा अधिकार : रामदास आठवले

  • कंगनाला रिपाई कार्यकर्त्यांचे संरक्षण

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आज ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. तिला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संरक्षण देण्यात येईल. तिला संरक्षण देण्यासाठी रिपाईचे कार्यकर्ते निळे झेंडे घेऊन मुंबई विमानतळावर दुपारी १२ पासून सज्ज राहतील, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. तसेच तिच्या घरालाही कार्यकर्त्यांकडून संरक्षण दिले जाईल, असे यात म्हटले आहे.  मुंबईत येण्यापूर्वी तिने ट्विट केले आहे, “रानी लक्ष्मीबईके पदचिन्होंपर चलूंगी, नही डरूंगी, नही झुकूँगी.”

“मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात ट्विटरवरुन कंगनाने आव्हान दिले होते. यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कंगनाशी फोनद्वारे संपर्क साधला होता. त्यावेळी तिने मी महाराष्ट्राची भक्त असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेनेने आता करू नये.

अभिनेत्री महिला असणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्य घटनेने सर्वांना विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कंगनाच्या संरक्षणासाठी उद्या रिपाईचे कार्यकर्ते निळे झेंडे घेऊन मुंबई विमानतळावर सज्ज असतील. तसेच कंगनाच्या घराला ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून संरक्षण देण्यात येईल, असे रामदास आठवले यांनी जाहीर केले.

काय आहे प्रकरण ?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.

मुंबई पोलिसांशी हुज्जत

ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*