उत्पादने वाढविण्याचे चीनचे आव्हान भारताने स्वीकारलेय…!!

  • भारतीयांना टोमणा मारणाऱ्या चीनी ‘ग्लोबल टाइम्स’च्या एडिटरला आनंद महिंद्रांचं खणखणीत उत्तर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत – चीन संघर्षात भारताला सतत शहाजोग सल्ले देणाऱ्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांना प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रांनी खणखणीत उत्तर दिले आहे. चीनने दिलेले आव्हान स्वीकारून भारतीय कंपन्या उत्पादने वाढवूनच दाखवतील, असे उत्तर महिंद्रांनी दिले आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये सोशल मीडियावर हा विषय चर्चेत असताना काल चीनच्या ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन (Hu Xijin) यांनी भारतीयांना टोमणा मारला. त्यावर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी खणखणीत उत्तर दिले.

“चीनच्या लोकांनी भारतीय वस्तूंवर बंदी आणा़यचे ठरवले तरी ते करू शकत नाहीत, कारण इकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत…” असे ट्विट हू शिजिन यांनी केले होतं. भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचे काहीतरी असायला हवे”असा टोमणाही त्यांनी ट्विटमध्ये मारला होता.

भारतीयांना चिथवणाऱ्या या ट्विटवर आनंद महिंद्रांनी शिजिन यांच्या त्या ट्विटला रिट्विट करत प्रत्युत्तर दिलं. “ही टिप्पणी कदाचित भारतीय कंपन्यांसाठी सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल…चिथवल्याबद्दल आभार. तुमचं चॅलेंज स्वीकारले”, अशा आशयाचे ट्विट केले.

आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट भारतीय नेटकऱ्यांनी उचलून धरले. ६६ हजारांहून अधिक जणांनी ते आतापर्यंत लाइक केले आहे. त्यावर नेटकरी आपल्या विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*