आक्रस्ताळ्या चीनला रोखण्यासाठी युरोपमधील अमेरिकेन फौजांची दक्षिण – पूर्व आशियात तैनाती

  •  अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचे निवेदन

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : भारत – चीन हिंसक संघर्षानंतर आशियातील चीनच्या आक्रमकतेला खीळ घालण्यासाठी आता अमेरिका सरसावली आहे. चीनमुळे भारतासह दक्षिणपूर्व आशियाला सामरिक धोका निर्माण झाला आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. यासाठी युरोपातील अमेरिकन फौजा हटवून त्या दक्षिण – पूर्व आशियातील तळांवर वेगाने तैनात करण्यात येत आहेत.

चीनचा – भारत तणाव, चीनचा व्हिएतनाम, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी वाद सुरू आहे. यासह दक्षिण चीन समुद्रात चीन आक्रमक झाला. याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) भारत-चीनमध्ये तणाव सुरू आहे. दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात चीनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. करोना व्हायरसमुळेही चीनला जगाभरातील तीव्र टीकेचा सामना करावा लागतोय. चीनच्या अलिकडच्या हालचाली पाहता अमेरिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने युरोपमधील आपले सैन्य हटवून आशियात तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

भारत आणि दक्षिण पूर्व आशियाला चीनचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अमेरिकेने युरोपमधील आपले सैन्य कमी केले आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले. जर्मनीतील अमेरिकेचे सैन्य का कमी करण्यात आले? असा प्रश्न पॉम्पिओ यांना करण्यात आला. तेथील सैन्याच्या तुकड्या या दुसरीकडे तैनात करण्यात येत आहे, असे पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा धोका

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाईने भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि दक्षिण चीन समुद्राला धोका आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याला योग्य ठिकाणी तैनात करण्यात येत आहे, असे पॉम्पिओ म्हणाले.

फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला चीनचा सामना करावा लागतोय. आपण या महिन्यात युरोपियन युनियनमधील परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीबाबत बरीचशी माहिती घेतली. यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून चिथावणीच्या घटनांचे तथ्य आहे. तसंच दक्षिण चीन समुद्रातील चीनची आक्रमकता, भारताशी घातक संघर्ष आणि शांतताप्रिय शेजाऱ्यांना धोका, अशा मुद्दांचा समावेश होता, असे माइक पॉम्पिओ यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*