बळीराजाची कहाणी!


सहा महिन्यांपासून घरात बसून वैतागलेला गणपत आज बऱ्याच दिवसांनी तालुक्याच्या गावाला जाऊन रात्री उशिरा घरी परतला आणि भाकरी खाऊन खाटल्यावर आडवा होत त्याने मोबाईल हाती घेतला. नेटवर्कच्या दांड्या फुल सिग्नल दाखवत होत्या. त्यानं मोबाईवरचा ई पेपर उघडला. (maharashtrian farmer)

समोर आलेली एक बातमी वाचताना, मुंबईत शिवाजी पार्कवरच्या पहिल्या सभेतलं राजसाहेबांचं टीव्हीवर पाहिलेलं भाषण त्याला आठवलं. जीन्स आणि टीशर्ट घालून ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी महाराष्ट्रात दिसावा, असं स्वप्न राजसाहेबांनी त्या सभेत रंगवलं होतं. गणपत नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता. त्या भाषणानंतर पुढे शिकायचा बेत रद्द करून फुलटाईम शेतकरी होण्याचे त्याने ठरवले, आणि दुसऱ्याच दिवशी तालुक्याला जाऊन जीन्स आणि टीशर्ट खरेदी केला.

ट्रॅक्टर घेण्यासाठी विकास सोसायटीतून कर्ज काढा असा लकडाही त्याने बापाकडे लावला. पोरगा आपल्यासारखा गरीब बळीराजा राहिला नाही, असा विचार करून बापाने शेतातल्या उभ्या पिकाच्या तारणावर ट्रॅक्टरसाठी कर्ज काढले, आणि एके दिवशी तालुक्याच्या गावातून आयशरवर बसून गणपत ऐटीत गावात दाखल झाला. गणपतच्या आईने ट्रॅक्टरची पूजा केली, आणि गणपतच्या कपाळावर बोटभर पिंजर चिकटवून तिने आपल्या कानशिलावर कडाकडा बोटे मोडली. त्या रात्री गणपत आनंदाने झोपला. सकाळी उठून त्याने खुंटीवरची जीन्स आणि टीशर्ट अंगावर चढवला आणि ट्रँक्टर घेऊन तो शेतात गेला.


दिवसभर नांगरणी करताना जोत धरून घामाघूम होणारा त्याचा बाप अंगणातल्या खाटेवरूनच गणपतचा रुबाब कौतुकाने न्याहाळत होता. तासाभरातच सारं वावर नांगरून गणपत परतला, आणि जीन्स खुंटीवर अडकवून त्याने लेंगा चढवला.maharashtrian farmer

आज ती बातमी वाचताना गणपतला ते दिवस आठवले. ट्रॅक्टरसाठी घेतलेलं कर्ज अजून फिटलं नव्हतं, आणि कर्जाच्या काळजीने खंगलेल्या गणपतच्या बापाने जगाचा निरोप घेतला होता. एक सुस्कारा टाकून गणपतने मोबाईलवर पासवर्ड टाकला. गोठ्याशेजारच्या गॅरेजमधला ट्रॅक्टर सुरू झाला. मोबाईलवरूनच रिव्हर्स गियर टाकून गणपतने खाटेवरूनच रिमोटने ट्रॅक्टर बाहेर काढला, आणि त्याची बोटं सफाईनं मोबाईलवर फिरू लागली.

आता ट्रॅक्टर थर्ड गियरवर शेताच्या दिशेने चालला होता. तेवढ्यात दुसरा पासवर्ड टाकून गणपतने विहिरीवरची मोटार चालू केली, आणि पाटाचं पाणी उसाच्या फडात वळवून दोन तासाचा टायमर लावला. तोवर पलीकडच्या गव्हाच्या ववरात नांगरणी उरकून घेऊ असा विचार करून गणपतने मोबाईलवूनच ट्रॅक्टर गव्हाच्या वावरात वळवला, आणि नांगरणीसाठीचा कोड नंबर फिरवला. आता गव्हाच्या वावरात नांगरणी सुरू झाली होती.

ऊसाच्या फडाला पाणी लावण्याचं काम दोन तास सुरू राहणार होतं. नंतर पुन्हा कोड नंबर फिरवून मोटार बंद करायची, असा विचार करून गणपतने मोबाईल बाजूला ठेवला, आणि त्याचा डोळा लागला…maharashtrian farmer

गोठ्यातल्या खुराड्यातलं कोंबडं जीव खाऊन ओरडलं, आणि गणपत खडबडून जागा झाला. बाहेर अजून उजाडलं नव्हतं. आपण विहिरीवरची मोटार चालू केली होती, आणि वावरात नांगरायला ट्रॅक्टर सोडला होता हे त्याला आठवलं, आणि त्याने मोबाईल उचलला. पुन्हा एकदा ट्रॅक्टर थांबवण्यासाठी पासवर्ड भरला, आणि मोबाईलच्या स्क्रीनवरचं एक वर्तुळ गरागरा गणपतच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. गणपत चक्रावला. आयत्या वेळी नेटवर्कनं दगा दिला होता.

maharashtrian farmer

त्याला मोटार आठवली. ती बंद करण्यासाठी गणपतची बोटं कोड नंबर फिरवू लागली, पण पुन्हा तेच चक्र गरागरा डोळे वटारल्यागत मोबाईलच्या स्क्रीनवर फिरू लागलं. गणपत हादरला. त्याने उशाकडची ब्याटरी उचलली, आणि शेताच्या वाटेवर फोकस मारत तो धावतच विहिरीजवळ पोहोचला. मोटार कधीच बंद झाली होती. डोक्यावर हात मारून घेत गणपत विहिरीत डोकावला. पाण्याने तळ गाठला होता. ऊसाचं वावर भरून वाहात होतं. त्याने मोटारकडे पाहिलं, आणि जळलेल्या वायरीच वास त्याच्या नाकात घुसला.

हे असं, रात्री अपरात्री कधीतरी वीज येणार, मग घरबसल्या शेती करून आपण कधी प्रगतीशील शेतकरी होणार, त्यापेक्षा बळीराजा राहिलेलंच बरं, असा विचार करत मनातल्या मनात नेटवर्कला लाखोली वाहात गणपतने कपाळावर हात मारून घेतला, जळलेल्या मोटारीच्या दुरुस्तीसाठी आता नवा खर्च उभा राहिला होता. गणपतने गव्हाच्या वावराकडे पाहिलं. डिझेल संपल्याने बंद पडलेला ट्रॅक्टर मान टाकलेल्या जनावरागत शेतपलीकडचा बांध ओलांडून आडवा पडला होता. गणपतने मोबाईलकडे बघितलं. ते चक्र अजूनही त्याच्याकडे पाहात गरागरा फिरतच होतं. नेटवर्कच्या दांड्या तर गुल झाल्या होत्या.maharashtrian farmer

नव्या खर्चाला आमंत्रण दिल्याच्या रागाने स्वतःलाच शिव्या देत गणपत घराकडे वळला, आणि खुंटीवरची जीन्स आणि टीशर्ट गुंडाळून त्याने कोपऱ्यात फेकला.

घरबसल्या शेती करण्याच्या स्वप्नाभोवती मोबाईलच्या स्क्रीनवरचं ते गरागरा फिरणारं चक्र अजूनही थांबलंच नव्हतं…

गोठ्यातली ढवळ्यापवळ्याची जोडी रवंथ करत करुण नजरेनं गणपतकडे पाहात होती…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था