वरील शीर्षक जरा विचित्र वाटेल, कारण ज्या दोन बैठकांची मी तुलना करतोय ती अनेकांना अनाठायी वाटू शकते. कारण त्यांच्यात साम्य नाही… ते नुसते वरवरचे साम्य – भेद नाहीत, तर राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक फितरत आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीनेही त्यांच्यात साम्य नाही… पण तरीही आजच्या राजकीय, सामाजिक परिप्रेक्ष्याच्या दृष्टीने या दोन वेगवेगळ्या बैठकांचा उहापोह करणे मला अगत्याचे वाटते.socio – politacal and cultural difference between RSS meeting and NCP meeting
वरील शीर्षक जरा विचित्र वाटेल, कारण ज्या दोन बैठकांची मी तुलना करतोय ती अनेकांना अनाठायी वाटू शकते. कारण त्यांच्यात साम्य नाही… ते नुसते वरवरचे साम्य – भेद नाहीत, तर राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक फितरत आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीनेही त्यांच्यात साम्य नाही… पण तरीही आजच्या राजकीय, सामाजिक परिप्रेक्ष्याच्या दृष्टीने या दोन वेगवेगळ्या बैठकांचा उहापोह करणे मला अगत्याचे वाटते.
- दोनच दिवसांपूर्वी बेंगळुरूत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक संपन्न झाली. तिच्या बाकीच्या तपशीलात जायची या लेखाची गरज नाही. शिवाय त्याचे तपशील वेगवेगळ्या बातम्यांच्या स्वरूपात पुढे आलेले आहेत.
- पण फक्त एक दोन मुद्द्यांचा उहापोह येथे लेखापुरता करणे आवश्यक आहे. तो म्हणजे संघाच्या निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानात वय – स्थान – विचार आणि अंमलबजावणी यांच्यात generational change अर्थात पिढी बदल होतोय हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा दीर्घसूत्री नियोजनाचा आहे.
- दत्तात्रेय होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाह पदावर निवड होऊन संघाच्या केंद्रीय निर्णय प्रक्रियेची सूत्रे विद्यार्थी परिषदेतून संघात गेलेल्या व्यक्तीकडे आली. त्याचबरोबर ती दक्षिणेकडील कर्नाटक राज्यातील व्यक्तीच्या हाती आली.
- अर्थात संघात प्रचलित मीडियाने ठरवलेल्या चौकटबद्ध नॅरेटिव्हने विचार करून पदवाटप किंवा जबाबदारी वाटप होत नाही. त्यामुळे होसबळेंच्या निवडीत मीडिया नॅरेटिव्हने सेट केलेला प्रादेशिक वाद नाही, तर दीर्घकालीन विस्ताराचा विचार यात आहे आणि त्यामध्ये दत्तात्रय होसबळेंचे आधीचे योगदान आणि संभाव्य योगदान यांचा निश्चित विचार केलेला आहे.
- संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील बदलही वर नमूद केलेल्या अनुषंगानेच करण्यात आले आहेत. यामध्ये पुढच्या १५ ते २० वर्षांच्या संघ परिवार विस्ताराचा खोलवर विचार आणि अंमलबजावणीचे नियोजन यांचा व्यापक आधार घेण्यात आला आहे.
- आता काल झालेली दुसरी बैठक पाहू… ही बैठक नवी दिल्लीत ६ जनपथ निवासस्थानी पार पडली. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीचा निष्कर्ष काय तर…खंडणीखोरीचा आरोप झालेले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी आहे हा…
- ही बैठक ज्येष्ठ नेते शरद पवारांनी घेतली. पवारांनी वयाची ८० वर्षे गाठली आहेत. सुमारे ५० वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. ५० पैकी सुमारे २५ वर्षे त्यांची कारकीर्द सत्तेच्या अगदी निकट आणि अवतीभोवती राहिलेली आहेत.
- या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने बैठक घेणे स्वाभाविक मानले पाहिजे… पण कालची बैठक तशी होती का… याचे उत्तर नकारार्थी आहे.
- कालची बैठक त्यांनी आता आपली पुढची वाटचाल काय असावी… आपल्या पक्षाची वाढ आणि विस्तार कसा असावा, त्याचे दीर्घसूत्री नियोजन कसे असावे, यासाठी घेतलेली नव्हती… ती घेतली होती… आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यावर जो भयानक १०० कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप झाला आहे, त्यात आपले नाव कुठेही येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आणि या आरोपातून स्वतःच्या आणि पक्षाच्या सुटकेसाठी काय करायचे, याचा विचार करण्यासाठी ही बैठक घेतली होती.
- या बैठकीत त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या. त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करण्यासाठी देखील ही बैठक नव्हती. पवारांना आपल्या कन्येला महाराष्ट्राची पहिला महिला मुख्यमंत्री करायचे आहे… असे काही लोक म्हणतात… पण या बैठकीत त्याचा विचार झाला नाही.
- तसेच पक्षाची राजकीय, सामाजिक भूमिका निश्चिती, त्याच्यापुढची आव्हाने आणि संधी, पक्षामध्ये नवविचाराच्या तरूणांना संधी, त्याचे नियोजन वगैरे बाबींवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली नाही.
- चर्चा झाली फक्त… आरोपातून आपली आणि आपल्या पक्षाची सुटका कशी करवून घ्यावी याची आणि आपणच फोडाफोडी करून महाराष्ट्रात जे सरकार बनविले आहे, ते आणखी किती दिवस टिकू शकेल, याची चाचपणी करण्याची.
- ८० पार केलेल्या शरद पवारांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ही वेळ आली आहे… की स्वतःहून त्यांनी आणली आहे, आपल्याच राजकीय आणि सामाजिक भूमिकेतून आणि कृत्यांमधून… याचा ज्याचा त्याने विचार करावा…
- वर मांडली, ती फक्त वस्तुस्थिती आहे… कोणाला मान्य होणारी… कोणाला अमान्य होणारी “हार्ड फॅक्ट…”
- पण या सगळ्यातून दोन बाबी अधोरेखित होतात त्या म्हणजे…
- ज्या संघावर निकरवाले, प्रतिगामी, ब्राह्मणवादी म्हणून दुगाण्या झाडण्यात काँग्रेसी संस्कृतीतल्या नेत्यांचे राजकीय आयुष्य गेले, ते संघवाले बैठकीत पुढच्या १५ ते २० वर्षांचे विचार विस्ताराचे नियोजन करतात. तशा दृष्टीने उपयोगी ठरतील, व्यक्तींचे गुणात्मक योगदान होईल, अशा निवडी – नियुक्त्या करतात…
- … आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणारे, उठता – बसता फुले – शाहू – आंबेडकरांचे नाव घेणारे नेते वयाच्या ८० व्या वर्षी आपली आणि आपल्या पक्षाची भ्रष्टाचारातून आणि १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपातून सुटका कशी करवून घ्यावी याचा विचार करण्यासाठी बैठक घेतात… यातच सगळे आले…
- -नेमका हाच वर उल्लेख केलेल्या दोन बैठकांमधला फरक आहे. दोन संघटनांमधल्या, नेत्यांमधल्या राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक फितरतीमधला देखील हा भेद आहे… तो आणि तोच अत्यंत महत्त्वाचा आहे…!!