निवडणूक फिरविणाऱ्या घोषणा आणि ओढवून घेतलेले पराभव…!!

जय श्रीरामची ही घोषणा राजकीयदृष्ट्या पॉप्युलर करण्यात ममतादीदींच्या चिडखोर स्वभावाचा जास्त हात आहे. त्या चिडल्या नसत्या, तर कदाचित भाजपला त्यांच्या विरोधात वेगळे हत्यार शोधावे लागले असते… पण ममतांकडून चिडखोरीची राजकीय चूक झाली आहे. अर्थात अशी चूक करणाऱ्या ममता काही पहिल्याच नेत्या नाहीत… त्यांचे पूर्वसूरी बरेच आहेत… ते कोणते, हे पुढे पाहू… Slogans of ‘Jai Sri Ram’ raised by BJP supporters as CM Mamata Banerjee was going to visit the house of a TMC worker who was beaten up and injured


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे काल नंदीग्रामच्या चिंचोळ्या गल्लीत जय श्रीरामच्या घोषणांनी स्वागत झाले. तृणमूळ काँग्रेसच्या एका जखमी कार्यकर्त्याला पाहायला त्या त्याच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी हातात कमळाचे चिन्ह असलेले झेंडे घेऊन काही कार्यकर्ते चिंचोळ्या गल्लीत उभे होते. त्यांनी ममता दिसताच जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. पण दीदी त्यांच्यावर चिडल्या नाहीत. कार्यकर्ते जोरजोरात घोषणा देत असताना दीदी त्यांच्या समोरून व्हिल चेअरवर बसून शांतपणे निघून गेल्या.

बंगालच्या अख्ख्या निवडणूकीतले हे विपरित चित्र होते… हे चित्र मी विपरित का म्हणतोय… ते लक्षात घेतले पाहिजे… मूळात जय श्रीराम ही घोषणा बंगालच्या निवडणूकीत एवढी लोकप्रिय का झाली, याचे इंगित जो समजावून घेईल, त्याला कालचे दीदींचे वागणे एरवीपेक्षा विपरितच वाटेल.

कारण जय श्रीराम ही साधी धार्मिक घोषणा पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय करण्यात दीदींच्या चिडखोर स्वभावाचा जास्त हात आहे. आणि गेल्या वर्षभरात तो अनेकदा दीदींनीच वर्तणूकीतून दाखवून दिला आहे. जय श्रीराम ही घोषणा दिल्यावर दीदी चिडतात हे बंगाली जनतेला त्यांनी स्वतःच दाखवून दिले आहे… कधी गाडी थांबवत जमावावर ओरडून किंवा कधी भाषण अर्धवट मध्येच सोडून… मग जनतेला यातून चिथावणी नाही मिळाली तरच नवल…

हा साधा व्यवहार आहे…ज्यामुळे जो चिडतो, त्याला त्या गोष्टीवरून जास्त चिडवले जाते आणि त्याची मजा इतरांकडून घेतली जाते. दीदींच्या बाबतीत साधारण गेले वर्षभर बंगालमध्ये हे सुरू आहे… काल त्याचीच एक झलक नंदीग्रामच्या चिंचोळ्या गल्लीत दिसली. पण दीदींचे वागणे मात्र गेल्या वर्षभरातल्या वागण्यापेक्षा विपरितच होते, म्हणजे सकारात्मक अर्थाने विपरित होते. त्यांनी घोषणा देणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि त्या व्हिल चेअरवर बसून निघून गेल्या. यातून त्यांचा स्वतःचा हिरमोड नाही झाला… हिरमोड झाला

तो घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा. त्यांनी दीदींना ज्या चिडवण्याच्या उद्देशाने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, तो उद्देश्य दीदींनी शांतपणे निघून जाऊन असफल ठरविला. हे एका उत्तम राजकारण्याचे लक्षण होते. पण हेच लक्षण किंवा हीच वर्तणूक दीदींनी साधारण वर्षभरापूर्वी दाखविली असती किंवा नेताजींच्या १२५ जयंती कार्यक्रमात दाखविली असती तर… तर अधिक बरे झाले असते, दीदींच्या दृष्टीने. त्यांनी स्वतःहून कोलीत दिले नसते घोषणा देणाऱ्यांच्या हातात तर, घोषणा देणाऱ्यांना आणि पर्यायाने भाजपला नवे हत्यार शोधावे लागले असते दीदींना घेरण्यासाठी आणि त्यांना डिवचण्यासाठी…

पण दीदींनी वर्षभरापूर्वी हे केले नाही आणि जय श्रीराम ही घोषणा आज बंगालच्या निवडणूकीतली मुख्य घोषणा होऊन गेली आहे आणि बंगाली जनता ती आता उस्फूर्तपणे देताना आढळते आहे. दीदी जय श्रीरामच्या घोषणेने चिडल्या हे खरे पण त्यांनी एकदाच चिडून ते सोडून दिले असते, तर कदाचित बंगालमध्ये सध्या जे रामायण घडतेय ते घडवायला भाजपला खरोखरच दुसरे डावपेच खेळावे लागले असते. आणि कदाचित ते सहजासहजी हाताला लागलेही नसते.

दीदींनी जय श्रीरामच्या घोषणांवर चिडणे ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजिक चूक ठरली आहे. आणि आज भाजपने त्या घोषणेचे राज्यभर भांडवल करून दीदींच्या १० वर्षांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. दीदींनी ही चूक करायला नको होती.

दीदी पहिल्याच नेत्या नाहीत…

अर्थात अशी चूक करणाऱ्या दीदी या काही पहिल्याच नेत्या नाहीत. अनेक बड्या – बड्या नेत्यांनी आपल्या राजकीय जीवनात अशा सुरूवातीला किरकोळ वाटणाऱ्या चूका केल्या आहेत आणि नंतर त्यांच्या काट्याचा नायटा झालेला आहे.

याची काही उदाहरणे पाहू… फार मागे जायला नको… फक्त ५० वर्षांपूर्वीची निवडणूक घ्या… १९७१, त्यावेळी बड्या विरोधी नेत्यांनी घोषणा दिली होती… “इंदिरा हटाओ”. ही घोषणा पॉप्युलर करणारे सगळे बडे नेते होते… अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरणसिंग, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा वगैरे… इंदिराजी त्यांच्यापेक्षा खूप लहान होत्या… त्यांनी तीच घोषणा फक्त कन्व्हर्ट केली… “गरीबी हटाओ”… आणि म्हणाल्या, लोकहो पाहा, ते म्हणताहेत, “इंदिरा हटाओ”… मी म्हणतेय, “गरीबी हटाओ”… लोकांनी ऐकले… इंदिराजींचे. त्यांनी इंदिराजींना मते देऊन बड्या नेत्यांना हटवून टाकले. राजकीय जीवनातून मोठा काळ हद्दपार केले. बाकी लोकांनी जरी इंदिराजींचे ऐकले तरी त्यांची गरीबी हटली नाही, हा भाग निराळा… पण “इंदिरा हटाओ” ही घोषणा बड्या विरोधी नेत्यांवर बूमरँग झाली होती हे खरेच.

मौत के सौदागर… बरीच महागात गेलेली घोषणा

यानंतरची उदाहरणे बरीच आहेत… पण सर्वोच्च नेत्याच्या चूकीचे उदाहरण आहे, २००७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकीचे… मोटेरा स्टेडियम… म्हणजे सध्याचे नरेंद्र मोदी स्टेडियम… काँग्रेसची जंगी सभा, गर्दीही बऱ्यापैकी जमलेली. या सभेला मी हजर होतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या कॉलमिस्ट इंद्राणी बागचीही तेथे होत्या. स्टेजवर काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल होते. सोनियाजी जोरात होत्या. केंद्रातील सत्ताधारी यूपीएच्या चेअरमन होत्या. (५ खासदारांच्या बळावर यूपीए चेअरमनशीपचे स्वप्न पाहणाऱ्या किंवा पुड्या सोडणाऱ्या त्या नेत्या नव्हत्या.)

समोर बऱ्यापैकी गर्दी होती… त्यांच्या भाषणाला प्रतिसादही चांगला मिळत होता… आणि तेवढ्यात त्या बोलून गेल्या… “मौत के सौदागर”… झाले, तिथेच माशी शिंकली… निवडणूक, जी साधारण इक्वल फूटिंगवर तोपर्यंत खेळली जात होती, ती फिरली… त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी “मौत के सौदागर”चा धागा अचूक पकडला आणि तो गुजरातच्या अस्मितेशी घट्ट बांधून टाकला… ती निवडणूक तर त्यांनी जिंकलीच पण आज १४ वर्षे झाली तो धागा एवढा घट्ट आहे, की मोदींच्या नेतृत्वाला तो पंतप्रधानपदापर्यंत घेऊन आला.

गरज होती का… सोनियाजींना “मौत के सौदागर” हे शब्द उच्चारायची किंवा तशी घोषणा करायची… पण मुखातून शब्द निसटले होते… बाण भात्यातून सुटला होता… थोडयाच दिवसांत परिणामही दिसला… तो परिणाम आजही कायम आहे.

जोशी – महाजनांच्या हातात सत्ता

राजकीय चूकांचे असेच असते… काट्याचा कधी नायटा होईल, सांगता येत नाही. १९९५ च्या निवडणूकीत शरद पवारांनीही अशीच बनावट राजकीय म्हण पॉप्युलर करण्याचा प्रयत्न केला… जोशी – महाजनांच्या हातात सत्ता देणार का… लोकांनी पवारांचे भाषण ऐकले. त्यात नाही अडथळा आणला, पण आपल्याला करायचे तेच केले… त्या निवडणूकीत लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हातात सत्ता दिली. जोशी – महाजन सत्तेचे वाहक झाले. पवारांसारख्या मुरब्बी आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या नेत्याला एवढी जातीवादी म्हण पॉप्युलर करण्याचा प्रयत्न करायची गरज होती का… पण नाही… पराभवाची भीती आणि राजकारणाचा कंडू सहज शमत नाही. त्यातून असे काहीतरी बोलले जातेच आणि विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळते. भल्या – भल्यांना त्यावेळी कळत नाही. उत्साहाच्या, राजकीय रागाच्या किंवा खुनशीत ते बोलून जातात आणि जनता बरोबर त्याचे माप त्यांच्या पदरात घालते.

माँ, माटी, मानूष

ममतादीदींचे असेच झाले आहे. त्या कुशल राजकारणी नाहीत, असे अजिबात नाही. डाव्यांची ३० – ३५ वर्षांची सत्ता उखडून फेकण्याची ताकद दाखविणाऱ्या त्या भारतातील एकमेव नेत्या आहेत. मोदी – शहांच्या अत्यंत आक्रमक भाजपलाही ते अद्याप जमलेले नाही. १० वर्षांपूर्वी ममतादीदींनीही अशी घोषणा पॉप्युलर केली होती, माँ, माटी, मानूष… अवघी बंगाली जनता त्या घोषणेला भूलली होती. एकदा, नव्हे तर दोनदा भरभरून मतदान करून बंगाली जनतेने त्यांना सत्ता दिली आहे.

पण आत्ता त्यांच्या हातून नक्की राजकीय चूक झाली आहे. ज्या घोषणेवर अजिबात चिडायची गरज नव्हती… किंवा चिडल्या तरी उघडपणे दाखवायची गरज नव्हती, त्या जय श्रीरामच्या घोषणेवर ममतादीदी चिडल्या… एकदा नव्हे, अनेकदा चिडत राहिल्या आणि आज जय श्रीरामची घोषणा बंगालच्या निवडणूकीत निर्णायक ठरते आहे… दीदींच्या हातून जे घडायचेय, ते घडून गेले आहे… निकालाची वाट पाहणे त्यांच्या हातात राहिले आहे.

इतिहास रिपीट होईल…??

याचा अर्थ वर लिहिलेल्या प्रत्येक निवडणूकीसारखाच अनुभव ममतादीदींना येईल असाही नाही… बंगाल निवडणूकीच्या निकालांचा हा अंदाजही नाही. पण एक नक्की… जेव्हा आपल्याला निवडणूकीत अडव्हांटेज असतो किंवा निवडणूक इक्वल फूटिंगवर असते, तेव्हा आपण स्वतःहून चूका करायच्या नसतात. इंदिराजी किंवा मोदींसारख्या नेत्यासमोर तर त्या करायच्याच नसतात. कारण हे दोन्ही नेते बोट दिले तर हात उखडून घेणारे आहेत, ती त्यांची कपॅसिटी आहे, हे त्यांच्या इतिहासाने सिध्द केले आहे…!! बंगालच्या निवडणूकीत हा इतिहास रिपीट होतोय का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरते आहे.

Slogans of ‘Jai Sri Ram’ raised by BJP supporters as CM Mamata Banerjee was going to visit the house of a TMC worker who was beaten up and injured

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*