शिवसेनाफोडीची litmus test फसली; पवारांच्या भू-राजकीय विस्तारवादाला मातोश्रीचा “लगाम”


राष्ट्रवादीचा आणि पवार घराण्याचा भू – राजकीय विस्तार करण्याचा शरद पवारांचा मनसूबा आहे. पारनेरच्या निमित्ताने पवारांनी political litmus test घेतली. ती फसली. “नेम” चुकला. पवारांना मुलाच्या वयाच्या उद्धव ठाकरेंपुढे माघार घ्यावी लागली…!! एवढे झाले तरी पवार गप्प बसतील…??


विनायक ढेरे

२०१९ चा जुगाड केल्यानंतर ज्या राष्ट्रवादी विस्तार हेतूने शरद पवारांनी सरकार आणले त्याच कामाला पवार लागले होते, पवार घराण्याचा भू – राजकीय विस्तार. विस्तारक्षेत्रही नगर जिल्ह्यासारखे पारंपरिक विरोधकांचे होते. पण “नेम” चुकला आणि भलतीकडेच “हात घातला” गेला. माघार घ्यावी लागली.

पारनेरचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग होता. प्रयत्न नगरसेवक फोडीचा होता, पण ती political litmus test होती. पारंपरिक नगर जिल्ह्यात किती शिरकाव करता येईल?, शिवसेना पोखरायची तर ती किती पोखरता येईल?, प्रतिक्रिया काय उमटेल? या प्रश्नाची उत्तरे पवारांना हवी होती. ती मिळालेली दिसतात. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना style आदळआपट न करता मिलिंद नार्वेकरांना कामाला लावून नगरसेवक परत मिळवले. पवारांनी स्वत: प्रयोग करून त्याचे तिकिट पार्थ आणि अजित पवारांवर फाडले. कारण बातम्या अजित पवारांनी शिवसेना फोडल्याच्या आल्या. यातही political litmus test ची मेख दडलेली आहे. पण काहीही झाले तरी शिवसेनेत घातलेला हात पवारांना मागे घ्यावा लागला ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.

खरे तर पवारांना over power नेता भेटला की ते थंड पडतात. नंतर आपल्या पित्त्या पत्रकारांकडून “मुत्सद्दी शांतते”च्या बातम्या पेरत राहतात. माघार त्यांना अनेकदा घ्यावी लागली आहे. पण बहुतेक वेळा ती केंद्रीय नेत्यांपुढे. राज्यातल्या मुलाच्या वयाच्या नेत्यापुढे मात्र पवारांना पहिल्यांदा माघार घ्यावी लागली आहे.


राज्यातल्या नेत्यांपैकी अनेकजण पवारांच्या वाटेला गेले आणि जातात, पण लांबून. पवारही त्यांच्या वाटेला जातात. तेही कधी “पुढून” किंवा समोरून नाही तर मागून. पारनेरमध्येही असेच ते “मागून” गेले. शिवसेनेचे नगरसेवक गळाला लावून पाहिले. ही त्यांची litmus test होती. शिवसेना सत्तेवर राहण्यासाठी कितपत उतावीळ आहे?, तिला आतून कसे पोखरता येईल? याची चाचपणी पवारांनी पारनेरमधून केली. पण उद्धव ठाकरेंनी एेकले नाही. पवारांनी “मागून” “अरे”करताच उद्धवनी “पुढून” “कारे” केले. मिलिंद नार्वेकरांना कामाला लावले. नार्वेकरांना active करणे यातच उद्धव किती serious mood मध्ये होते, हे पवारांना समजले असावे. त्यातूनच damage control करण्यासाठी त्यांना मातोश्री गाठावी लागली. आणि चंद्रकांत पाटलांनी डिवचूनही “मला मातोश्रीवर जाण्यात कमीपणा वाटत नाही”, अशी मखलाशी करावी लागली.

पोलिसांच्या बदल्या असोत की पारनेरमधली पक्षफोडी या दोन्ही घटना पवारांची मूळ राजकीय फ़ितरत सांगतात. ती म्हणजे कोणतेही काम “मागून” साध्य करवून घेण्याची त्यांची चालबाजी. पण निदान या दोन्ही बाबतीत तरी पवार आज ठाकरेंपुढे हरले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना कदाचित फार हलक्यात घेतले. पण ठाकरेंनी पवारांना “करून दाखवलेले” दिसतेय.

मराठी मीडिया मात्र या प्रकरणाला महाआघाडीतला असमन्वय, नेत्यांमधला विसंवाद अशा भाषेत रंगवत आहे. मीडिया पवारांच्या माघारीची खरी कहाणी सांगत नाही की त्यांच्या राजकीय फ़ितरतीवर प्रकाशही टाकत नाही.

याचा अर्थ असा नाही की पवार यापुढे गप्प राहतील. पुढचे उरलेले राजकारण सरळ मार्गाने करतील. त्यांचा मूळ राजकीय स्वभाव त्यांना गप्प राहू देणार नाही. कितीही मुत्सद्दी, बुद्धिमान, जबरदस्त, जाणता वगैरे विशेषणे पवारांना लावण्यात आली असली तरी वयाची आणि कर्तृत्वाची मर्यादा कुणाला चुकलेली नाही. पवारही त्याला अपवाद असू शकणार नाहीत. पवार आपला मूळ राजकीय स्वभाव आणि वर उल्लेखलेली मर्यादा यात अडकले आहेत. मूळ स्वभाव बदलणार नसला तरी वय वाढणार आहे. कर्तृत्व घटणार आहे, हे अपरिहार्य आहे.

वास्तविक उद्धव ठाकरे जितके प्रशासकीय कौशल्यात कमी पडतील, तितके पवारांना हवे आहे. तेवढीच पवारांना प्रशासनावर grip मजबूत करता येईल. पण उद्धव प्रशासकीय कौशल्यात कमी असले तरी राजकीय कौशल्यात पवारांपुढे फिके पडलेले दिसत नाहीत. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेर प्रकरणात त्यांनी राजकीय कौशल्य दाखवलेले दिसते.

पवारांना २०१९ चा लग्गा जरूर लागला. काही निर्णय मनासारखे फिरवूनही घेता आले. राष्ट्रवादीच्या आणि पवार घराण्याच्या भू – राजकीय विस्ताराचे मनसूबे रचता आले. पण त्याची फळे पवारांना पूर्वीसारखी मिळालेली नाहीत. कारण गेल्या सहा महिन्यात त्यांना पूर्वीसारखी सत्तेवर grip बसवता आलेली नाही. मग त्यात कोरेना, तिजोरीतला खडखडाट, अजित पवार ही कारणे असतीलही. त्यामुळे पवार “पूर्वीसारखे उरले” नाहीत, ही वस्तुस्थिती बदलत नाही. त्यातच थेट उद्धवना हात घालण्याचा प्रकार घडला. भले तो चाचपणीसाठी असेल. पण पवारांना हात मागे घ्यावा लागला ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था