वीरांगना रामप्यारी :आततायी तैमूर लंग याला पराभूत करण्यांसाठी प्रकटलेली भवानी!

  • भारतीय ऐक्य घडविणारी योद्धा

इतिहासात फंदफितुरीच्या गोष्टी खूप सांगितल्या जातात. परंतु वीरांगना रामप्यारीने भारतीय ऐक्याचा युद्धभूमीवर अभूतपूर्व संगम घडवला आणि क्रूरकर्मा तैमूरला पराभूत करून दाखवले.


वीस वर्षांची एक तेजस्वी तरूणी ४०,००० स्त्रियांची फौज उभी करण्यासाठी सहाय्य करते,त्यांना प्रेरित करते आणि तिचं यशस्वी नेतृत्त्वं करते! एखाद्या टोळधाडे प्रमाणे जिथे जाईल तिथे सगळं नेस्तनाबूत करून, जाळून विध्वंस पसरवणार्‍या निर्दयी तैमूर लंग नावाच्या आततायी आक्रमकाला आणि त्याच्या राक्षसी सेनेला जेरीला आणते! ही तरूणी म्हणजे रामप्यारी चौहान(गुर्जर)! जिने १३९८ मधे मेरठ आणि पुढे हरिद्वार इथे तैमूरवर केलेल्या हल्ल्यांत हजारो महिलांचं नेतृत्त्वं केलं! जिची तळपणारी बुद्धी आणि तलवार शत्रूंना भयभीत करून गेली! अतिशय रोमांचक अशा या लढ्यांत ८०,००० च्या वर सैनिक लढले! फंद फितुरीने आणि दगाबाजीने किडलेल्या अनेक लढायांची उदाहरणं आपल्याला दिली जातात. पण हे युद्धं मात्र अभूतपूर्व संघटन आणि ऐक्यामुळे खूपच ऐतिहासिक आणि अनुकरणीय ठरतं जे प्रत्येक भारतीयाने वाचलं पाहिजे! ज्याची शिरोमणी आहे रामप्यारी नावाची वीरांगना!

रामप्यारीचा जन्म (आताच्या) उत्तर प्रदेशच्या साहरणपूर मधे एका चौहान (गुर्जर) कुटुंबात झाला. लहानपणापासून मुलांसारखीच वेशभूषा करणारी राम प्यारी खूपच धाडसी आणि वृत्तीने स्वतंत्र होती. शूरांच्या कथा ऐकायला, धावणं, कुस्ती,नियमित व्यायाम करायला, अन्य साहसी खेळांच्या शर्यती पहायला, त्यात भाग घ्यायला तिला खूपच आवडायचं! अन्यायाचा तिला प्रचंड राग येत असे. युवतींना शारीरिक सक्षम होण्यासाठी तिने जागृत केलं.

समरकंद म्हणजे (सध्याच्या)उझबेकिस्तानचा शासक तैमूर लंग भारतात आला. दिल्ली मधे पोचेपर्यंत १३९८ च्या शेवटी तैमूरने लाखो माणसांना कापून काढलं होतं…पुरुष, स्त्रिया, मुले सगळ्यांना गुलाम म्हणून कैद केलं होतं. हजारो मंदिरं, घरं आणि जे वाटेत येईल ते चिरडून तो पुढे निघाला होता. त्याचा हा हैदोस, हा छळ थांबवणार कसा?दिल्लीमधल्या अत्याचाराच्या रक्तरंजित कथा ऐकून सगळ्यांचा थरकाप उडाला!

त्या वेळी देवपालांकडे हरियाणा, मेरठ, साहरणपूर, हरिद्वार इत्यादि भागांचं नेतृत्त्वं होतं. पंचायत व्यवस्था होती. तैमूर लंगच्या चिंतेने सगळेच ग्रासलेले होते. तेव्हा देवपालांनी तातडीने एक महापंचायत बोलवली ज्यात तैमूरची आगेकूच रोकण्यासाठी सगळ्या समाजाला आवाहन करून एका छत्राखाली संघटित करण्यांत आलं.भोवतालचे सगळे नेते ही हाक ऐकून आवर्जून उपस्थित झाले. ही महापंचायत जाट, गुर्जर, अहीर, वाल्मिकी, राजपूत, ब्राह्मण, आदिवासी आणि इतर असंख्य समाजांना विचारपूर्वक एकत्र घेऊन पुढची योजना आखू लागली.

त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यांत आले- तैमूरच्या मार्गातली पुढची गावं रिकामी करायची, मुले आणि ज्येष्ठांना सुरक्षित ठिकाणी हलवायचं, ५०० तरुण घोडेस्वार गुप्तचर तैमूरच्या पुढच्या योजनांना पूर्णपणे जाणून घेण्यासाठी तैनात करायचे आणि मुख्य म्हणजे सक्षम अशा जास्तीत जास्त स्त्रिया आणि पुरुषांनी तत्काळ शस्त्रांचं प्रशिक्षण सुरू करून महापंचायत सेनेमधे सामील व्हायचं!या संपूर्ण सेनेचं नेतृत्त्वं होतं महाबली जोगराज सिंह गुर्जर यांच्याकडे.

त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या समाजांचे गट कार्यरत होते! सगळ्या महिलांची एक मोठी फौज करण्यांत आली, जिची पुढारी होती राम प्यारी! तिच्यात युद्धकौशल्य आणि नेतृत्त्व गुण ओतप्रोत भरलेले होते! तिने महिलांना प्रेरित केलं. बघता बघता सगळीकडून ४०,००० पर्यन्त स्त्रिया एकत्र आल्या! त्यातल्या सगळ्याच अनुभवी होत्या असं नाही पण जास्तीत जास्त सैन्य उभं राहणं ही त्या काळाची गरज होती..नाही तर कुणाचंच अस्तित्व शिल्लक राहणार नव्हतं! हे ओळखून जमेल त्या शक्तीने आणि शक्य त्या कौशल्याने या स्त्रिया एकत्र आल्या तेही निरनिराळ्या समाजांमधून, परंपरांमधून आणि पुढे एकमेकींच्या सहकार्याने लढल्या!

सगळे योजनेप्रमाणे एकत्र आले…भगवद गीतेचं स्मरण करून मातृभूमीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ घेण्यात आली!घोषणांनी आसमंत दुमदुमला!रणभेरी निनादल्या! योजना ठरली- गुप्तचरांनी आणलेल्या बातमीनुसारच पुढची पाऊलं उचलायची! छोट्या छोट्या गटांमध्ये विभागलं जायचं, आधुनिक युद्धनीतीत ज्याला गोरीला वॉरफेअर म्हणतात ते अवलंबून त्यासाठी (ambush, hit and run tactics, raid)छापा मारण्याच्या वेगवेगळ्या कृती करायच्या!

स्त्रियांच्या फौजेमधे अनेक गटनेत्या होत्या जशा की हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंदो ब्राह्मणी, रामदाई त्यागी इत्यादि, ज्यांना गटवार जवाबदार्‍या देण्यांत आल्या! स्त्रिया शत्रूवर नेमून दिलेल्या वेळी हल्ला करतील. संधी साधून शत्रूसैन्याची हत्यारं, रसद लुटून आणतील. काही स्त्रिया आपल्या सगळ्या सैनिकांना शस्त्रं, दारूगोळा, रसद इत्यादि महत्वाच्या गोष्टी पुरवतील अशी अनेक कामं वाटून देण्यांत आली.

या महापंचायत सेनेच्या २०,००० सैनिकांनी दिल्लीच्या पुढे सलग तीन रात्री बेसावध तैमूरवर गुप्तपणे हल्ला केला. त्याचे ९-१० हजार सैनिक मारले गेले. मग तो मेरठ च्या दिशेने पुढे येत असतांना…गावं च्या गावं ओस पडलेली पाहून त्याची आणखीन निराशा झाली! सगळं सैन्य हवालदिल झालं. लुटायला काहीच नाही! लोकांनी विहिरीत टाकलेल्या कचर्‍यामुळे पाणी पिण्याचीही सोय उरली नाही! दिवसा काही सैनिक त्यांच्यावर तुटून पडायचे आणि रात्री त्यांच्या शिबिरांवर रामप्यारीची फौज हल्ला करायची जे तैमूरला पूर्णपणे अनपेक्षित होतं!या स्त्रियांना पाहून त्याला मोठाच धक्का बसला! सततची उपासमार, रोजचं जगरण होतंच शिवाय बेसावध शत्रूवर छुपा हल्ला करून त्यांची सामग्री लुटणं, शस्त्रं आणि रसद पळवणं यामुळे शत्रुसैन्य वैतागलं आणि त्यांच्यात दहशतच पसरली. तैमूर कसाबसा हरिद्वारच्या दिशेने पुढे सरकला.

तेव्हा डोंगरी भागातले तीरकमान चालवण्यांत निष्णात असलेले स्त्री पुरुषसुद्धा तैमूरवर मोठ्या प्रमाणात तुटून पडले. घमासान लढाई झाली. इथेच हरवीरसिंह गुलिया याने तैमूरवरवर वार केले. तो धारातीर्थी पडला! तैमूरला काखेत जखमा,अग्रावर विष लावलेल्या बाणांनी जागोजागी घायाळ अशा जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत त्याच्या माणसांनी तिथून उचलून तत्काळ काढता पाय घेतला!

या जखमांमधून तैमूर कदाचित पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. नंतर ७ वर्षानी त्याचा मृत्यू झाला. त्याचे असंख्य सैनिक मारले गेले. मेरठ आणि हरिद्वारच्या या युद्धांत आपलेही हजारो स्त्री पुरुष लढवय्ये धारातीर्थी पडले. पण मातृभूमीची हाक ऐकून ते एकत्र आले आणि प्राणपणाने लढले! तैमूरला तिथेच रोकण्यांत त्यांना यश आलं आणि त्याच्या विध्वंसापासून पुढचा भारत वाचला!या संग्रामांत नेतृत्त्वं करणारी निर्भीड आणि रणधुरंधर रामप्यारी आणि एवढ्या संख्येने एकत्र येऊन इतिहास घडवणार्‍या तिच्या सहकारी असलेल्या पराक्रमी दुर्गांना मानाचा मुजरा!

  • सौजन्य : फेसबूक
  • https://mohinigarge.blogspot.com/

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*