केलदीची राणी चेन्नम्मा: औरंगजेबाचे मनसुबे धुळीला मिळवणारी लखलखती तलवार!

  • केलदीची राणी चेन्नम्मा : औरंगजेबाचे मनसुबे धुळीस मिळवणारी लखलखती तलवार!

रणकौशल्य आणि आणि कारभार कौशल्य याच्या जोरावर राणी चेन्नम्माने केलदीवर २५ वर्षे राज्य केले. विजापूरचा बादशहा आणि खुद्द औरंगजेब यांना तलवारीचे पाणी पाजत जेरीस आणले.


दक्षिण भारतात अनेक पराक्रमी राण्या होऊन गेल्या ज्यांनी आपल्या शौर्याने तसंच प्रशासनातल्या कौशल्याने संपूर्ण भारताला स्तिमित केलं! आक्रमकांपासून राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवत वर्षानुवर्षं उत्तम पद्धतीने राज्यकारभार सांभाळला! कर्नाटकातल्या केलदी राज्याची राणी चेन्नम्मा हे यातलंच मुख्य नाव! सामान्य घरात जन्म घेऊन सुद्धा जिने स्वत:च्या कर्तृत्त्वाने, अफाट धैर्य आणि सामर्थ्य दाखवत मोठा इतिहास रचला! जिने चिक्कदेवरायसारख्या राज्यांना फक्त सैन्यबळावर नव्हे तर स्वतःच्या औदार्याने जिंकत मैत्रीमध्ये बदललं. विजापूरचा सुलतान असेल वा औरंगजेब…त्यांचे मनसुबे उधळून लावले आणि ताठ कण्याने राज्य सांभाळलं! जिने नवनवीन आयाम देऊन केलेदीचं राज्य सर्वार्थाने समृद्धं केलं! शेवटच्या श्वासापर्यंत प्रजेचं पुत्रवत पालन केलं! जी मुघल सैन्यावर वीजेसारखी कोसळली…अशी केलदीची राणी चेन्नम्मा!

कर्नाटकातल्या कुंदनपूर गावात एका सामान्य व्यापारी कुटुंबामधे चेन्नम्मा जन्माला आली. तिचे वडील सिद्धाप्पा शेट्टी लिंगायत समाजाचे होते. महादेवावर नितांत श्रद्धा ठेऊन त्याची अखंड उपासना करणारं हे कुटुंब खूप धार्मिक आणि तत्त्वनिष्ठ होतं. दैवी सौंदर्याचं वरदान लाभलेली चेन्नम्मा तितकीच गुणी आणि सत्त्वशील होती!

१६६४ मधे राजा सोमशेखर नायक केलदीच्या गादीवर बसला (सध्याच्या शिमोगा जिल्हयाजवळ). तो अतिशय हरहुन्नरी होता. त्याच्या अधिपत्याखाली हे राज्य गोव्यापासून ते खाली मलबार पर्यंत विस्तीर्ण असं वाढत गेलं. अत्यंत तडफदार, देखणा, शक्तीशाली, बुद्धिमान आणि न्यायप्रिय होता!एकदा रामेश्वरमधे चेन्नम्मा तिच्या वडिलांसह आलेली असतांना तिचं रूप, असामान्य धैर्य आणि आत्मविश्वास पाहून, ती राजवंशातली नसतांना सुद्धा सोमशेखर राजाने तिला रीतसर मागणी घातली. १६६७ साली बिदानूर इथे केलदीच्या राजधानीमधे त्यांचा विवाह संपन्न झाला!

राजा सोमशेखर आणि राणी चेन्नम्माचं अतिशय मैत्रीपूर्ण नातं होतं.लग्नाच्या आधी तिची कौटुंबिक पार्श्वभूमी,परंपरा सगळं खूप वेगळं होतं. केलदीची राणी झाल्यावर राजाच्या प्रोत्साहनामुळे तिने शस्त्राभ्यास नुसताच सुरू केला नाही तर त्यात ती लवकरच पारंगत झाली! राजकारण, प्रशासन असे राज्यकारभाराचे सगळे पैलू तिने आत्मसात केले. अतिशय बुद्धिमान असलेली चेन्नम्मा बरोबरीने संगीत आणि साहित्यात रमली…त्यातही तिने एक वेगळी ऊंची गाठली!

तिने आपल्या राज्यात विद्वानांना निमंत्रित केलं, त्यांना मानाने वसवलं, त्यांच्यासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या! परिणामी राज्यात आणि आजूबाजूला पुरातन शास्त्रांची साधना, चर्चा, नवीन संशोधनांचे आविष्कार अशी ज्ञानाची गंगा भरभरून वाहू लागली! राजाने हळूहळू प्रशासन तसंच न्यायव्यवस्थेसाठी तिचे सल्ले घेऊन ते अमलांत आणले! दुष्ट प्रवृत्तींना कठोर शासन करून सज्जनांच्या मागे ती ठामपणे उभी राहू लागली. तिचा एकही सल्ला किंवा निर्णय चुकीचा ठरला नाही. राज्यातली जनता या राणीचा अतिशय आदर करू लागली. जणू भविष्यासाठीचेच हे सगळे संकेत होते. कारण नियतीच्या मनांत वेगळंच काही होतं!

राणी चेन्नम्मा प्रजेच्या गळ्यांतला ताईत बनली पण राजा सोमशेखरचा १६७७ मधे घातपाताने मृत्यू झाला. षडयंत्र रचून हे दुष्कृत्य करण्यांत आलं होतं. राज्याचे लचके तोडण्यासाठी शत्रू टपलेलेच होते. पण राणी डगमगली नाही. तिने पोलादी स्त्री होऊन राज्यकारभारावर चांगलाच जम बसवला. बसप्पा नायकाला दत्तक घेऊन त्याचं प्रशिक्षण सुरू केलं. राजाच्या घातपाताचा शोध लावला. विश्वासू आणि निष्ठावान लोकांनाच मंत्रीपदावर नेमून दूरदृष्टीने निर्णय घेत राज्यकारभार सुरू ठेवला.

विजापूरच्या सुलतानाची हार :

मोठ्या सैन्यानिशी विजापूरचा सुलतान राणीवर चालून आला. ही बातमी कळताच राणी सावध झाली. एक किल्ला बिदानूरचा आणि दुसरा घनदाट जंगलातला भुवनगिरी असे दोन किल्ले म्हणजे केलदी राज्याची बलस्थानं होती. तिने मंत्र्यांशी सल्लामसलत करून चतुराईने राजकोश आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जंगलात असलेल्या भुवनगिरी किल्ल्यांत हलवल्या. शत्रूसैन्य बिदानूरला पोचलं तेव्हा त्यांच्या हाती काहीही लागलं नाही! तोपर्यंत आत भुवनगिरीमधे राणीने सैन्य, शस्त्रास्त्रं सगळं सज्ज केलं. सुरूवातीला तिला विरोध करणारे मंत्री सुद्धा आता भुवनगिरी मधे येऊन तिला सामील झाले. सुलतानाचं सैन्य तिथे पोचतांनाच राणीच्या नेतृत्त्वाखाली घनघोर युद्धं झालं. विजापूरच्या सुलतानाला सपशेल माघार घ्यावी लागली!

मैसूरच्या चिक्कदेवरायाशी युद्धं:

आजूबाजूच्या बनवासी, सिरसी अशा अनेक राजांनी केलदीवर चढाई केली पण त्या सगळ्यांना परतून लावत राणी अजिंक्य ठरली. पुढे मैसूरचा चिक्कदेवराया चालून आला. त्याला वाटलं एक स्त्री असा कितीसा विरोध करणार? तिचं सैन्य असं कितीसं सक्षम असणार? तो आणि राणी यांच्यामधे तीन वेळा युद्धं झालं. राणीने दणदणीत विजय मिळवला. पण तिचं आचरण खूप तत्त्वनिष्ठ होतं. युद्धकैद्यांना काहीही त्रास न देता अतिशय सन्मानाने तिने परत पाठवलं. या तिच्या अतुलनीय शौर्यामुळे, औदार्यामुळे चिक्कदेवरायाने तिच्याशी मैत्रीचा तह केला! स्त्रीचं हे सामर्थ्यशाली रूप पाहून तो थक्क झाला! मनापासून तिचा आदर करू लागला!

राजरामला आश्रय देण्याचं धैर्य:

शिवपुत्र संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ मधे राजारामचा राज्याभिषेक झाला. लगेच मुघलांनी तिथे हल्ला केला. मराठे आणि मुघल यांच्यात लढाई झाली. राजारामाला सुरक्षित ठेवण्यासाठी जिंजीच्या किल्ल्याकडे रवाना करण्यांत आलं. तो केलदीमधे वेश पालटून थांबला.भिक्षा मागणारे भिक्षुक हे कुणीतरी वेगळे आहेत हे राणीने ओळखलं! तो राजाराम होता. राजरामने सगळी हकीकत सांगून जिंजीपर्यंत त्याला सुरक्षा व्यवस्था देण्याची राणी चेन्नम्माला विनंती केली. याचे खूप गंभीर परिणाम होऊन औरंगजेब आपल्या मागे लागेल हे माहिती असूनही राणीने राजारामला मोठ्या हिमतीने आणि आनंदाने आश्रय दिला. त्याचं आदरातिथ्य केलं! औरंगजेबाने गडगंज संपत्ती देऊन दूत पाठवला. ती स्वीकारून राजारामाला त्याच्याकडे सोपवण्यासाठी! पण तो दूत केलदीमधे पोचण्याआधीच राणीने सुरक्षित मार्गाने राजारामाला पुढे पाठवून दिलं होतं!

औरंगजेबाशी टक्कर:

राणीच्या या वागण्याने उद्विग्न होऊन औरंगजेबाने त्याचा मुलगा अझमथ अरा याला प्रचंड सैन्य आणि शस्त्रांनिशी केलदीवर लढण्यासाठी पाठवलं. या युद्धाकडून औरंगजेबाला खूप अपेक्षा होत्या, विजयाची खात्री होती! पण राणीच्या सैन्याने या मुघलांना डोंगर दर्‍यांमद्धे गाठून अक्षरशः चिरडून टाकलं. आत्तापर्यंत अझमथने अनेक राजांना हरवलं होतं, पण एका स्त्री कडून हरण्याच्या कल्पनेनेच तो भयभीत झाला! राणीच्या सैन्याने मोठ्या संख्येने मुघलांचे घोडे , दारू गोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त केली. हे युद्धं बरेच दिवस चाललं. औरंगजेबाने निराशेने अझमथला पत्राद्वारे केलदीचा नाद सोडून जिंजीकडे कूच करण्याची आज्ञा दिली. अझमथने राणीला दयेची भीक मागितली आणि उरलेल्या सैन्यासह तो पसार झाला. औरंगजेब या पराभवामुळे खूपच अस्वस्थ झाला! त्याचा गर्व चकणांचूर झाला!

पुढे राणीने १६९६ पर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय न्यायाने, निष्ठेने आणि कुशलतेने केलदीचं राज्य सांभाळलं! आज आपण बघतो की शासन काल हा ५ वर्षांचा असतो! पण थोडी कल्पना केली तर जाणवतं की सततच्या आक्रमणांमुळे अतिशय असुरक्षित अशा वातावरणांत एकटीने वीस ते पंचवीस वर्षं राज्यकारभार सांभाळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे!ही गोष्ट राणी चेन्नम्मा ने करून दाखवली! झुंजण्यासाठी हा चिवटपणा, लढण्यासाठी मनगटांत सामर्थ्य, प्रजेच्या कल्याणाची आतोनात ओढ…आणि स्वतःच्या जिवापेक्षा जास्त आपल्या मातृभूमीवर प्रेम..निस्सीम भक्ती…ही अपरंपार निष्ठा…कुठून येते? सगळ्या भारतीयांना उन्नत राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून देणार्‍या या सर्वगुणसंपन्न तेजस्वी रणरागिणीला…केलदी चेन्नम्माला मानाचा मुजरा!

  • सौजन्य : फेसबूक
  • https://mohinigarge.blogspot.com/

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*