राणी अवंतीबाई: १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातली तळपती तलवार!

वज्रनिश्चय आणि धैर्य यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामगढची राणी अवंती बाई. चार हजारांची फौज उभारून राणीने ब्रिटिशांना रणमैदानात धूळ चारली. ब्रिटिशांशी लढतानाच ती अमर झाली.


ब्रिटिशांविरुद्धचा उठाव स्वातंत्र्य संग्रामात रूपांतरित झाला आणि बघता बघता हा वणवा भारतभर पसरला! आजूबाजूची अनेक राज्यं खालसा केली जात असतांना ब्रिटिशांच्या मोठ्या सैन्याबळासमोर, आधुनिक शस्त्रांसमोर गुडघे न टेकवता आपल्या अफाट धैर्याने शेवटच्या श्वासापर्यंत झुंजणारे हे स्वातंत्र्यवीर कोणत्या मातीचे बनलेले होते? अशीच वज्रनिश्चयी आणि धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामगढची राणी अवंतीबाई…जिने पहिल्या लढाईमधे ४००० सैन्यासह चढाई करून ब्रिटीशांना पराभव चाखवून परत पाठवलं. आणि दुसर्‍या युद्धांत ब्रिटीशांच्या हाती सापडण्यापेक्षा जिवाची बाजी लाऊन…अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी क्रांतीची ही ज्वाला अमर झाली! स्वातंत्र्याची ऊर्मी तिच्या रगारगांत वहात होती!

२६ एप्रिल १८३१ ला मध्यप्रदेशच्या मनकेहणीमधे राणी अवंतीबाईचा जन्म झाला. लोधी समाजाचे जमीनदार जुझार सिंह तिचे वडील होते. लहानपणापासून अतिशय धाडसी असलेली अवंती बाई निर्भीडपणे संकटांना सामोरी जात असे! पुढे अतिशय पराक्रमी असा रामगढचा राजा विक्रमादित्य सिंह याच्याशी तिचा विवाह झाला. १८३० साली महाराजा रामचंद्र सिंहने खरमेर नदीच्या किनारी भव्य अशा या रामगढ संस्थांनाला वसवलं होतं!सध्या हे रामगढ मध्यप्रदेशातल्या डिंडौरी जिल्ह्याचा भाग आहे.

काही वर्षांनी राजा विक्रमादित्य खूप आजारी पडला. तेव्हा राणी अवंतीबाईने राज्याची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. प्रशासनामधे लक्षं घातलं आणि मुख्य म्हणजे दूरदृष्टी ठेऊन पुन्हा शस्त्राभ्यास सुरू केला!

ब्रिटीशांनी भारताच्या अनेक राज्यांच्या कारभारामधे हस्तक्षेप सुरू केला. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थानं खालसा केली होती. मागे पुरुष वारस न ठेवता एखाद्या राजाचं निधन होणं किंवा राजा राज्य सांभाळण्यासाठी सक्षम नसणं (incompetent) अशा वेगवेगळ्या सबबींखाली ब्रिटिशर्स अनेक राज्यं गिळंकृत करू लागले!

ब्रिटिशांचा रामगढमधे हस्तक्षेप:

राजा विक्रमादित्य काही दिवसांपासून अंथरुणावर आहे हे कळताच ब्रिटिशांनी राज्यात हस्तक्षेप सुरू केला. १८५१ मधे राजाला पूर्णपणे अकार्यक्षम ठरवून त्यांनी तिथे स्वत:चा अॅडमिनिस्ट्रेटर नेमला. अवंतीबाईने या गोष्टीला कडाडून विरोध केला. परिणामांची चिंता न करता त्याला बाहेर काढून स्वतःचं राज्य पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेतलं. दुर्दैवाने राजा विक्रमादित्यचं निधन झालं. त्यानंतर राणीचे दोन्ही लहान मुलं अमन आणि शेर सिंह यांना उत्तराधिकारी म्हणून स्वीकारण्यास ब्रिटिशांनी सपशेल नकार दिला. पुढची ६ वर्षं राणीने अत्यंत संघर्षात काढले. ब्रिटिश वारंवार त्यांच्या प्रशासकाकरवी बळजबरीने सगळे निर्णय घेत राज्यकारभारत त्रास देत होते. तरी राणीने कदापि त्यांना रामगढच्या किल्ल्यात प्रवेश करू दिला नाही.

मेरठ कॅंटॉन्मेंट मधे १० भारतीय शिपायांनी आजूबाजूच्या भारतीयांच्या मदतीने ५० ब्रिटिशांना ठार मारल्याची घटना राणीच्या कानावर आली. अवंतीबाईने या संग्रामात सामील व्हायचा निर्णय घेतला. रामगढच काय पण ब्रिटिशांना भारताच्याही बाहेर घालवून देशाला स्वतंत्र करण्याचं उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन ती त्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करू लागली. तिने शेजारी राजांना मदतीसाठी दरडवणारी साद घातली- मातृभूमीच्या रक्षणासाठी आता नाही तर केव्हा एकत्र येणार! अनेक राजे तिने ब्रिटीशांविरुद्ध वळवून घेतले. सगळे भेद मागे टाकून जमीनदार, ठाकूर, मालगुजर यांना संघटित केलं. अथक कष्टांनी आणि बुद्धिकौशल्याने ४००० सैनिकांची फौज उभारली!२६ सप्टेंबर १८५७ ला पहिलं पाऊल तिने उचललं- रामगढ मधे नेमण्यांत आलेल्या सगळ्या ब्रिटिश ऑफिसर्सना बाहेर हाकलून राज्याच्या खजिन्याचा ताबा घेतला! यामुळे ब्रिटिश खूप चावताळले.

पहिलं घनघोर युद्धं: 23 नोव्हेंबर १८५७

इंग्रजांनी भरपूर सैन्यानिशी २३ नोव्हेंबर १८५७ ला राणीवर हल्ला केला. हे युद्धं झालं रामगढमधल्या मंडल जवळच्या खेरी या गावांत. राणीने स्वतः या युद्धांचं नियोजनबद्ध असं नेतृत्त्वं केलं…झुंजार नेतृत्त्वं! तिचे सैनिक प्राणपणाने लढले. रणचंडी होऊन ती तुटून पडली शत्रूवर! या युद्धमधे तिच्यापुढे संख्येने अधिक असलेल्या ब्रिटिशांचा निभाव लागला नाही.

या युद्धाचं अनन्यसाधारण महत्त्वं:

या युद्धाचं भारताच्या पाहिल्याच स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्त्वं आहे. १८५७ मधले अनेक उठाव अपयशी ठरले होते ज्यामुळे सगळ्यांना निराशा वाटत होती. अनेक लढे इंग्रजांनी निर्दयपणे अक्षरशः चिरडून टाकले होते आणि यापुढे कोणी अशी बंडखोरी करू नये यासाठी भारतीयांच्या मनांत प्रचंड भीती निर्माण केली जात होती. म्हणून अवंतीबाईने अशा प्रकारे युद्ध जिंकण्याने एक मोठाच इतिहास घडला आणि ही सकारात्मक प्रेरणा देशभर संक्रमित झाली!

ब्रिटिशांचा पलटवार:

काही दिवसांतच म्हणजे मार्च १८५८ मधे या जखमी सापांनी प्रचंड सैन्य आणि शस्त्रांसह राणीवर पुन्हा हल्ला चढवला.अगदी अचानक. इंग्रज वाटेत दिसेल त्या भारतीयांची कत्तल करत सुटले. संपूर्ण रामगढचं आतोनात नुकसान केलं. उभ्या पिकांना, घरांना भस्मसात केलं. त्यांच्याशी कडा मुकाबला करून राणी सुरक्षेसाठी देवहारी गढ या उंच ठिकाणी गेली. परिस्थिती ओळखून मुलं अमान आणि शेर सिंह यांना राणीने आलोनी गावात ठेवल्यामुळे ते सुरक्षित राहिले. मोकळ्या मैदानात लढण्या ऐवजी ती डोंगरावरून युद्धं लढू लागली. ब्रिटिश वारंवार तिला स्वाधीन होण्यासाठी धमकी देत होते. देवहारला घेराव घालून तिला जिवंत पकडण्यासाठी ते अथक प्रयत्न करत होते.पण ती कधीच त्यांच्या हाती लागली नाही!

शेवटपर्यंत चिवट झुंज दिल्यावरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तेव्हा ब्रिटिशांना शरण येण्यापेक्षा राणीने मृत्युला जवळ करायचं ठरवलं. २०मार्च १८५८ रोजी जवळच्या तलवारीने तिने स्वत:ला संपवलं….वय होतं अवघं २७ वर्षे! शरीर थांबलं पण तिचं धैर्य, तिचा त्याग… इतिहासात अमर झाला! तिच्या या बलिदानांतून क्रांतीची ज्वाला आणखीन धगधगली…! राणी भारतभर प्रेरणेचा स्त्रोत झाली! राणी अवंतीबाई हिला मनाचा मुजरा!

खरं सीमोल्लंघन : राज्य-भाषा-जाती-धर्म-लिंग या सीमा ओलांडून अखंड भारताचा विचार:

अनेक परकीय आक्रमणं पचवून या वीर आणि वीरांगनांनी त्यांची राज्यं सांभाळली म्हणून आजचा भारत आपल्याला दिसत आहे. आज सीमेवर लढणार्‍या सैनिकाला, अधिकार्‍याला जसे इतर कोणतेही संदर्भ नसतात….तो भारतासाठी लढणारा एक सैनिक असतो… आणि सीमेच्या पलीकडे असतो शत्रू! तसंच इतिहासातले हे वीर सुद्धा ज्या समाजात त्यांनी जन्म घेतला तो समाज,त्यांची भाषा, ते पुरुष आहेत की स्त्री… या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मातृभूमीसाठी लढले! परकीय आक्रमकांसमोर ते फक्त भारतीय होते! म्हणून आपणही त्यांचा पराक्रम जातीपातींच्या भिंतींमधे कोंडून न ठेवता ते पराक्रमी वीर संपूर्ण भारताचे आहेत हा विचार मोठा केला पाहिजे!

भारतातली स्त्री शक्ती :

अ‍ॅनी ओकलेय ही अमेरिकेची एक प्रथितयश रायफल शूटर असं म्हणाली होती की “ I would like to see every woman know how to handle firearms (guns) as naturally as they know how to handle babies!” भारतातल्या कोणत्याही वीरांगनेचा अभ्यास करतांना मला हे वाक्य आवर्जून आठवतं! कारण एका हातात शस्त्रं आणि दुसर्‍या हातात मूल…एवढंच काय पण पूर्ण राज्याचं प्रशासन देखील इथल्या स्त्रियांनी सांभाळलेलं आहे! भारतातल्या राण्या मालिकांमध्ये दाखवतात तसे केवळ भरजरी वस्त्रं परिधान करून कट कारस्थानं करत विलासी आयुष्य जगत नव्हत्या! तर शस्त्रविद्या, प्रशासन,मुत्सद्देगिरी, न्याय व्यवस्था,अर्थव्यवस्था या विविध पैलूंमद्धे तरबेज होऊन तडफदार नेतृत्त्वं करणार्‍या होत्या! त्यांचा संसार हा महालापुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण प्रजा त्यात समाविष्ट होती! दूरदृष्टी ठेऊन राज्याच्या भविष्याचा विचार करणं आणि वर्षानुवर्षं प्रजेच्या कल्याणसाठी निरंतर झटणं यामुळे राणी म्हणून त्यांनी आदर कामावला होता!
या राण्यांची आठवण आजही स्फूर्तिदायक आहे! ती भारताची अस्मिता आहे! अशा दुर्गा उत्तरोत्तर भारतात घडत राहोत आणि भारताच्या सीमा रक्षणांत तसंच कुशल प्रशासन,कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सगळ्यांच क्षेत्रांत योगदान देत राहोत…!दृढ इच्छेने आणि धाडसाने अनवट वाटा स्वीकारून त्यात यशस्वी होत राहोत! या सदिच्छेसह इतिहासाच्या पानांत दडलेल्या या दुर्गांची ही स्मरणमालिका अंबेच्या चरणी अर्पण!

  • सौजन्य : फेसबूक 
  • mohinigarge.blogspot.com

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*