राणी अबाक्का महादेवी: पोर्तुगिजांना कडाडून विरोध करणारी दक्षिणेतली तेजस्वी अग्निशिखा!

तिच्या शब्दकोशात बहिण-भावाचा भय नावाचा शब्दच नव्हता अशीही राणी अभया प्रबळ परकीय सत्ता पोर्तुगीजांच्या नाकात तिने दम आणून त्यांचा दीर्घकाळ पराभव केला होता.


भारतीय नौदलात Inshore Patrol Vessels (IPV) ची एक नौका २० जानेवारी २०१२ रोजी विशाखापट्टणम बंदरात दाखल (कामिशन) झाली…नाव होतं ICGS राणी अबाक्का! (Indian Coast Guard Ship). इतिहासाच्या पानांत लपलेल्या अबाक्का राणीच्या सन्मानार्थ भारतीय नौसेनेने घेतलेलं हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे! कोण होती राणी अबाक्का?
सातव्या शतकापासून भारताच्या दक्षिण किंनारपट्टीवरून मसाले, कपडा, लढाऊ घोडे असा अरेबियन देशांबरोबर निर्यातीचा व्यापार होत असे ज्यामुळे हा दक्षिण किनारपट्टीचा प्रदेश खूपच संपन्न होता! या नफ्याच्या व्यापारावर अनेक युरोपियन शक्ती डोळा ठेऊन तिथे शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील होत्या. अखेर पोर्तुगिजांनी प्रवेश केलाच! पण त्यांच्या मनमानीला, जाचक अटींना, धमक्यांना न जुमानता एक प्रचंड बळकट अशी अभेद्य शक्ती पोर्तुगिज आणि भारत यांच्यामधे उभी राहिली ती म्हणजे तेजस्वी राणी अबाक्का!तिचे अग्निबाण अनेक लढाऊ जहाजांचा वेध घेऊन त्यांना भस्मसात करायचे! भीती हा शब्द जिच्या शब्दकोशांतच नव्हता ती राणी अबाक्का! या निर्भीडपणामुळे राणीला “अभया राणी” असं सुद्धा नाव पडलं! The queen who knew no fear!

तुलूनाडू प्रदेशातला चौटा राजवंश:

तुलूनाडू प्रदेश म्हणजे आजच्या कर्नाटकाचा एक भाग. तिथे चौटा राजवंशातला तिरूमला राय तिसरा हा राजा होता. भव्य अशा तुलू प्रदेशाची राजधानी होती पुट्टीग आणि सहाय्यक राजधानी होती उल्लाल -एक महत्त्वपूर्ण बंदर! त्याकाळी तिथे मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे राज्याची उत्तराधिकारी होती राजाची भाची अबाक्का! लहानपणापासून तलवार, धनुर्विद्या, military strategy, diplomacy इत्यादि अनेक गोष्टी शिकत त्यात ती पारंगत झाली. तिचा राज्याभिषेक झाला. ती तुलू प्रदेशाची राणी झाली. प्रशासनावर तिने उत्तम रीतीने जम बसवला.सावळ्या वर्णाची राणी अतिशय तेजस्वी होती. पण राणी असूनही तिच्या साध्या राहणीमानामुळे, सामान्य कपड्यांमुळे, प्रजेशी एकरूप होऊन ती सगळ्यांची अत्यंत आवडती राणी झाली!


राजाने त्याच्या निधनाच्या आधी तिचं लग्नं शेजारच्या मंगलोर राज्याचा राजा लक्ष्मप्पा बंगाराजा याच्याशी लावलं. पण मातृसत्ताक पद्धती असल्याने राणी, राजा आणि त्यांच्या मुली उल्लाल मधेच राहिल्या. त्यानंतर राजा लक्ष्मप्पानेच राणी विरुद्ध फितुरी केली, त्यांचं लग्नं टिकलं नाही. लग्न बंधनातून वेगळं होण्याचं स्वातंत्र्य त्याकाळी राणीला होतं!नंतर राणीने पूर्णवेळ राज्याकडे लक्षं एकाग्र केलं.

पोर्तुगिजांचा वाढता विस्तार:

वास्को द गामा १४९८ मधे कॅलिकत (सध्याचं कोझिकोड) मधे पोचला. त्यानंतर पोर्तुगिज चिकाटीने टिकून राहिले. पाच वर्षांनी पोर्तुगिजांनी कोचीनमधे त्यांचा पहिला किल्ला बांधला. मग मस्कत, मोझांबिक, श्रीलंका, इंडोनेशिया इत्यादि अनेक ठिकाणी किल्ल्यांची मालिकाच उभी केली!डच, फ्रेंच, ब्रिटिश अशा कोणाचाही शिरकाव तोपर्यंत न झाल्याने पोर्तुगिजांनी चांगलंच वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यांच्या कामाला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड असल्याने काही वर्षांतच घुसखोरी करून त्यांनी दक्षिण किनारपट्टीमधे ठिकठिकाणी आपली केंद्र उभारली आणि जबरदस्तीने व्यापारासाठी त्यांचे परवाने आवश्यक असल्याचं सांगितलं. अनेक सरदारांनी नमतं घेतलं.

उल्लाल: strategic importance असलेलं समृद्धं निर्यात केंद्र:

उल्लाल बंदराचं दळण वळणाच्या दृष्टीने खूपच महत्त्व होतं. मोठं निर्यात केंद्र असलेलं उल्लाल हे अतिशय समृद्ध बंदर होतं. राणी अबाक्का ही उत्तम प्रशासिका होती. मलालीचं बांधलेलं धरण याची साक्षच आहे…ज्याची मजबूत बांधणी आणि सुयोग्य रचना तिने जातीने पाहिली! राज्यासाठी असलेली कमालीची दूरदृष्टी हे तिचं मोठंच सामर्थ्य होतं! तिच्या राज्यात आणि सैन्यात जैन, हिंदू,मुस्लिम असे वेगवेगळे जाती पंथ सलोख्याने रहात होते! सैन्य अतिशय प्रबळ होतं तिचं. शिवाय आजूबाजूच्या राजांनाही संघटित करून त्यायोगे कौशल्याने पोर्तुगिजांना दूर ठेवण्यांत ती यशस्वी होत होती! मसाल्यांबरोबर तांदूळ, मिरची, कपडे अशा व्यापारामुळे उल्लाल अधिकाधिक समृद्ध होत गेलं!

१५५६ मधली लढाई: पोर्तुगिजांची माघार

राणीने पोर्तुगिजांची कोणतीही अट, त्यांचा कोणताही परवाना मानण्यांस पूर्णपणे नकार दिला. त्यांच्या धमक्यांना भीक न घालता ती राज्यकारभार,व्यापार करत
राहिली. त्यामुळे पोर्तुगिजांनी अनेक हल्ले करून पाहिले पण उल्लाल काही हाती येईना! त्यांना माघारी परतावंच लागलं. १५५६ मधे अॅडमिरल डॉन अलवारो द सिल्वेरिया याला पोर्तुगिजांनी रवाना केलं. प्रचंड आरमार असूनही राणीच्या चपखल युद्धनीती आणि त्वरित प्रत्याघात केल्याने तो अॅडमिरल नाही टिकू शकला! पोर्तुगिजांना परत एकदा पराभवाचा सामना करावा लागला.

१५६८ चा प्रचंड मोठा हल्ला:

पोर्तुगिजांनी जनरल जोवो पेक्सिटोच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा मोठाच हल्ला केला. उल्लाल शहर त्यांनी ताब्यात घेतलं. पण राणी गुप्त स्थळी आश्रयाला थांबली. रात्रीतून २०० च्या वर सैनिक तिने जमा करून परत हल्लाबोल केला…घोड्यावर विजेसारख्या चपळाईने फिरणारी ही रणरागिणी अशी काही शत्रूवर तुटून पडली… की या हल्ल्यांत जनरल पेक्सिटो मारला गेला! राणीने उल्लाल तर परत घेतलंच पण पोर्तुगिजांना मंगलोरचा किल्लाही सोडायला भाग पाडलं! जरी पोर्तुगिजांनी लवकरच मंगलोर परत घेतलं तरी उल्लाल त्यांच्या कक्षेत आलंच नाही. तिथे मात्र राणीचा दबदबा कायम राहिला!पुढे राणीने कॅलिकतच्या झामोरिन इत्यादि अनेक शेजारी राज्यांना संघटित केलं कारण तेही पोर्तुगिजांविरूद्ध होते.

अंतिम युद्ध:

१५७० मधे पोर्तुगिजांनी त्यांचा गोव्याचा वॉइस रॉय अॅंथनी द नोरोन्हा याला ३००० सैन्यासह आणि मोठ्या प्रमाणात युद्धनौका (battle ships)घेऊन पाचारण केलं. पहाटेच्या बेसावध क्षणी ही राक्षसी सेना उल्लाल वर येऊन धडकली. हे कळताच राणी घोड्यावर स्वार झाली. तिने आजच्या आधुनिक भाषेत counter offensive ची योजना आखली. हजारो अग्निबाण घेऊन सज्ज असलेल्या सेनेला राणी गरजून सांगू लागली, “जमीन, समुद्र, रस्ता, किनारा….जिथे गरज असेल तिथे लढा पण या पोर्तुगिजांना परत पाठवा. मातृभूमीला वाचवा.” त्यांच्या अग्निबाणांनी शत्रूच्या अनेक युद्धनौका जाळल्या. पण राणीचा नवराच बदला घेण्यासाठी पोर्तुगिजांना जाऊन मिळाला होता. दुर्दैवाने काही भ्रष्ट सरदारांमुळे राणीला पोर्तुगिज अटक करून घेऊन गेले. ती अखेरपर्यंत बंदिवासात होती. पण कितीही यातना झाल्या तरी ती शेवटपर्यंत पोर्तुगिजांना शरण गेली नाही. त्यातच ती अमर झाली!या घटनेमुळे खचून न जाता राणीच्या मुलीही आणखीन खंबीरपणे पोर्तुगिजांविरुद्ध लढल्या! तिच्या मुलीचं नाव अबाक्का दुसरी.

राणी अबाक्काचं कर्तृत्त्वं आणि हा इतिहास अधिकाधिक संशोधन करून सगळ्यांपर्यन्त पोचवण्याच्या ध्यासाने १९९५ साली “राणी अबाक्का तुलू अध्ययन केंद्र” स्थापन करण्यांत आलं ज्याचे संस्थापक अध्यक्ष होते प्राध्यापक तुकाराम पुजारी! १५ जानेवारी २००३ रोजी राणीच्या सन्मानार्थ पोस्टल स्टॅम्प सुद्धा काढलेला आहे. राणी अबाक्का उत्सवात राणीची आवर्जून आठवण काढली जाते, तिच्या नावे पुरस्कारही दिला जातो!

प्रबळ सैन्य, आधुनिक तंत्रज्ञान असूनही राणीने अनेक वर्षं धैर्याने लढत पोर्तुगिजांना दूर ठेवलं. तिच्या या लढ्यामुळे पोर्तुगिजांसारख्या शत्रूची इतर राजांना गांभीर्याने ओळख झाली आणि त्याविरुद्धं लढण्यासाठी ते सज्जही झाले! उत्तम प्रशासन, दूरदृष्टी आणि अतुलनीय धैर्याने पोर्तुगिजांशी लढणारी ही पहिली वीरांगना जिने उज्ज्वल असा इतिहास घडवला! “बाहेरच्या आक्रमकांना सहन केलं जाणार नाही…इथलं वैभव लुटण्याचा त्यांना काही एक अधिकार नाही” हा मोठाच संदेश आपल्या पराक्रमातून देणार्‍या या राणी अबाक्काला त्रिवार मानवंदना!

  • सौजन्य : फेसबूक
  • https://mohinigarge.blogspot.com/

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*