होय भाई, तुम्ही आम्हाला हसायला शिकवलंत


Dear भाई,

काही सर्च मारायला म्हणून Google ओपन केलं आणि तुमचं दर्शन झालं. आज तुमचा १०१ वा वाढदिवस. म्हणून google ने तुमचं google doodle तयार केलं. त्या निमित्याने google ला तुमचे पाय लागले, असं म्हणायला हरकत नाही. व्हाँट्स एपच्या स्टेटस वर इंस्टाच्या स्टोरीज वर दरवर्षी प्रमाणे तुम्ही झळकता आहात.

बऱ्याचजणांनी तुमच्यावर कविता केल्यात आणि लेख देखील लिहिलेत. खरंतर तुमच्या या वाढदिवसानिमित्य आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम देखील झाले असते. पण सध्या पृथ्वीवर corona नावाचा रोग लोकांचा डोक्यावर थयथया नाचतोय आणि त्यामुळे तुमचा वाढदिवस हा प्रत्येक जण जमेल तसा आपापल्या परीने साजरा करतोय. आई पण मगाशी सांगून गेलीय, आज केळीचे शिकरण आणि मटार उसळ करत्ये.

तुम्हाला पत्र लिहिण्यास कारण की, म्हटलं तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावत आणि दुसरं म्हणजे इथे पृथ्वीवर फार काही चांगलं चाललेलं नसताना या परस्थितीत तुमचा अंतू बरवा, नारायण, सखाराम गटणे, रावसाहेब, चितळे मास्तर, हरी तात्या, नाथा कामत, म्हैस आणि आपल्या बटाट्याचा चाळीतील सगळ्यांनी आम्हा समस्त पृथ्वीवासीयांना मात्र कायम साथ दिली, हेही तुमच्या कानावर घालावे.

सक्काळी सकाळी म्हैस किंवा हरितात्यांची गोष्टी ऐकताना काम कशी झरकन होतात आणि दुपारी 4 वाजता चहाच्या फुरक्या मारत आज नाशिकच्या सगळ्या म्हशी तुर्तास गाभण का गो आई, हे म्हणताना ओठांवर एक मिश्किल हसू येतं. खरतर रोज नवीन प्रश्नांना भिडत जीव थकलास होतो. पण रात्री चितळे मास्तरांचं रघुवंश ऐकताना जशी तंद्री लागायची तशीच तंद्री लागते आणि त्यात हसता हसता शांत झोप कधी लागते हे कळतच नाही.

सामान्य माणसांना रोज नवीन गोष्टींना समोर जावं लागतंय त्यात जर मी काही तात्विक किंवा सत्य परिस्थिती बद्दल लिहिलं तर त्यात नवीन ते काय? त्यात जर क्षण दोन क्षण तो हसला तर खरी गंमत. असं म्हणून तुम्ही रचलेली प्रत्येक पात्र आज आम्हाला इतकी आपलीशी वाटतात की ती नव्या रुपात आम्हाला कुठे ना कुठे तरी भेटत राहतात. आणि मग कळतं भाई हे व्यक्तिमत्त्व किती अफलातून आहे ते.

माणसाला हसवणं हे खूप अवघड काम आहे. पण ते तुमच्यासाठी नाही, हे मात्र तितकच खरंय. माझा पुतळा उभा केलात तर त्या खाली, “या माणसाने आम्हाला हसवले”, असे लिहा हे तुम्ही सांगितल होतं. आणि आज प्रत्येक मराठी माणसाचा मनात तेच वाक्य पक्के कोरले गेलयं, हे मात्र नक्की.

बाकी वर तुम्ही आहात म्हटल्यावर तिथलं सगळं क्षेम असणार याची खात्री आहे.

कळावे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था