राजकीय नौटंकीत हाथरसच्या निर्भयाचा न्याय हरवू नये

  • दिल्लीतील निर्भयास न्याय उशीरा मिळला. हाथरसच्या निर्भयाचा न्याय मात्र
  • राजकीय नौटंकीत हरवून जाता कामा नये.

हाथरसच्या दलित मुलीवर झालेला बलात्कार ही गंभीर घटना काल नोएडा – हाथरसच्या रस्त्यावरील अर्ध्या दिवसाच्या “राजकीय नौटंकीत” रूपांतरित झाली आणि दिल्लीतल्या निर्भयाच्या आणि हाथरसमधील निर्भयाच्या प्रकरणांमधील भेदही ती अधोरेखित करून गेली.


विनायक ढेरे

हाथरसच्या दलित मुलीवर झालेला बलात्कार ही गंभीर घटना काल नोएडा – हाथरसच्या रस्त्यावरील अर्ध्या दिवसाच्या “राजकीय नौटंकीत” रूपांतरित झाली आणि दिल्लीतल्या निर्भयाच्या आणि हाथरसमधील निर्भयाच्या प्रकरणांमधील भेदही ती अधोरेखित करून गेली.

दिल्लीतल्या निर्भयाकांडात सुरवातीस राजकीय नौटंकी कमी पण संपूर्ण देशभरात उसळलेला प्रक्षोभ अधिक होता. तिला न्याय देण्याची मागणी सुरवातीस तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडून नव्हे तर सर्वसामान्य घटकांमधून पुढे आली होती. नंतर राजकीय पक्षांना त्यात राजकीय लाभ दिसला. परंतु तो पर्यंत निर्भयाच्या न्यायाचा आक्रोश देशव्यापी पसरला होता. हाथरसच्या दुर्दैवी निर्भयाच्या बाबतीत नेमके उलटे घडले आहे. काँग्रेसने या प्रकरणात स्वत:चे राजकीय पुनरूज्जीवन “शोधले” आहे.

अत्याचार, बलात्कार वाईटच… कोणीही कोणावरही केला तरीही निंदास्पदच…!! पण त्याहीपेक्षा निंदनीय ठरते ती राजकीय नौटंकी. उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हणे राहुल गांधींची कॉलर धरून त्यांना खाली पाडले.
ते नेमके रस्त्यालगतच्या गवतात पडले. जणू “हिमशिखराचा कडाच” कोसळला आणि काँग्रेसजनांच्या हातात “राजकीय बटेर” लागले. दुपार नंतर हाथसरच्या निर्भयाचा मूळ विषय पडला बाजूला पडला आणि काँग्रेस कृत “राजकीय बटेरबाजी” नौटंकीने जोर पकडला. काँग्रेसजनांनी एवढी राजकीय कबुतरे उडवली की एरवी त्यांचा बाजूने उभे राहू शकणारी अखिलेश, मायावतींसारखी प्रमुख राजकीय नेते मंडळी सावध झाली. त्यांनी योगींना ठोकून घेतले पण काँग्रेसजनांच्या टोळक्यात ते काही सामील झाले नाहीत.

काँग्रेसजनांनी डरपोकयोगी ट्विटरवर मोठया प्रमाणावर ट्रेंड केला पण ते योगींची “खरी डरपोकगिरी” विसरले. हे तेच योगी आहेत ज्यांच्या सरकारच्या गोळीसमोर भल्याभल्या गुंडांची फाटते. बडे – बडे डॉन एन्काउंटरमध्ये मरतात. त्यांच्या गाड्या उलटून पडतात. आणि गुंड उरलेच तर ते गळ्यात पाट्या अडकवून “मला गोळी घालू नका” असे सांगत पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर होतात.

इथे हाथरस प्रकरणात योगी सरकारचे अनावश्यक आणि लटके समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची 100% जबाबदारी योगी सरकारचीच आहे. त्यात कुचराई झाली तर सरकारला ठोकलेच पाहिजे. परंतु कालच्या दुपारची राजकीय नौटंकी योगी सरकारला खऱ्या अर्थाने ठोकणारी होती काय?… याचे स्वतंत्रपणे उत्तर “अजिबात नाही” असेच द्यावे लागेल. कारण हाथरसचा मूळ विषय बाजूला काढून काँग्रेसजन राहुल भोवती कोंडाळे करीत बसले. त्यांनी भरपूर राजकीय राळ उडवून दिली. हाथरसच्या घटनेत त्यांनी काँग्रेसचे राजकीय पुनरूज्जीवन शोधले. म्हणूनच तो राजकीय विषय तितकाच निंदनीय आणि ठोकण्याचा ठरतो.

हाथरसच्या निर्भयाच्या घटनेला जातीय किनार आहे. दलित विरुद्ध सवर्ण असा संघर्ष असेल तर तो कायद्यानेच सोडवला गेला पाहिजे. ही जबाबदारी उत्तर प्रदेशच्या हिंदुत्ववादी योगी सरकारचीच आहे. डावे लिबरल्स हे नेहमी सवर्ण – दलित अशी फूट पाडतच राहणार हे “राजकीय गृहीतक” मानून या विषयावर हिंदुत्ववाद्यांनी जालीम उपाय करणे ही जबाबदारी खुद्द त्यांचीच आहे. ती त्यांना आणि योगी सरकारला अजिबात झटकता येणार नाही.

हाथरस प्रकरणी यु. पी. पोलीस दोषी असतील तर त्यांनाही सोडता काम नये. दिल्लीतील निर्भयाला उशीर होऊन न्याय मिळला. हाथरसच्या निर्भयाला तो लवकर मिळला पाहिजे. राजकीय नौटंकीत तो हरवून जाता कामा नये. परंतु, कालच्या काँग्रेसजन कृत राहुल – प्रियांका नौटंकीमुळे मूळ विषय बाजूला पडला हे दुर्दैवी आहे.