लोक नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसाठी पैसे देतात मग पत्रकारितेसाठी का नाही?

माध्यमातील कंपन्यांकडे पैसे नाहीत, असे अजिबात नाही. पण तो पैसा आला कुठून, हे अनेकवेळा स्पष्ट होत नाही. त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो. जो पैसा येतो तो ब ऱ्याच वेळा मालक किंवा वरिष्ठच लाटतात. कंपनीतील शेवटपर्यंत त्याचा फायदा पोहोचतच नाही. असे सगळ होत असताना आपण सब्सक्रिप्शनरुपी पैसा दिला तर त्याचाही मूठभर लोकच फायदा करून घेणार नाही, याची खात्री कोण देणार, असे सामान्यांना वाटत असावे, म्हणूनच ते ओटीटीसाठी पैसे द्यायला तयार होतात पण माध्यमांसाठी नाही, असेही लेखकाने म्हटले आहे. People pay for Netflix, Amazon Prime, so why not for journalism?


हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासह अनेकजण गेल्या काही वर्षांपासून याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात हा विषय वाटतो तितका सरळ नाही आणि त्याचे उत्तर सहजासहजी मिळणेही शक्य नाही. पण म्हणून प्रश्नाचं महत्त्व कमी होत नाही. माझ्यासह अनेक जण नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रिप्शनसाठी महिन्याला हजारो रुपये खर्च करतात. पण डिजिटल स्वरुपातील किंवा व्हिडिओ स्वरुपातील पत्रकारितेच्या प्रोजेक्टसाठी सब्सक्रिप्शनकडे वळायला अनेक लोक तयार होत नाही. वृत्तपत्रांसाठीही जास्त पैसे द्यायला तयार होत नाही. सगळ्यांना सगळं फुकटच हवं असतं.

विविध माध्यमातील पत्रकारितेसाठी पैसे द्यायला लोकांनी तयार व्हायला पाहिजे, पण प्रत्यक्षात तस घडत नाही. आजच एक ब्लॉग वाचण्यात आला. त्यामध्येही हा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर काही प्रश्नरुपी उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिथर ब्रायंट यांनी या विषयावर लिहिलंय. ते तुमच्यापर्यंतही पोहोचलं पाहिजे, म्हणून त्यातील काही प्रश्न इथे देतोय.
हिथरने म्हंटलंय की, पुढील काही प्रश्नांची उत्तरे मला माध्यम संस्थांनी किंवा कंपन्यांनी दिली पाहिजेत. कोणताही वाचक वेबसाईटवर किंवा व्हिडिओ चॅनेलवर आल्यावर त्याला आधी या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.

 • माध्यम संस्थेने गेल्या काही वर्षांत कोणत्या महत्त्वाच्या विषयांचे वार्तांकन केले?
 • सध्या सुरू असलेल्या कोणत्या विषयांचे वार्तांकन माध्यम संस्था करणार आहे?
 • वृत्तसंस्थेचा आशय या माध्यम संस्था वापरतात का? त्याचे एकूण आशयामध्ये प्रमाण किती?
 • वार्तांकनाच्या कोणत्या प्रोजेक्टसाठी त्यांनी कोणत्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून निधी घेतला आहे का? तो किती आहे?
 • माध्यम संस्थेतील वरिष्ठ पातळीवरील वार्ताहर कोणत्या विषयाचे वार्तांकन करतात? त्यांचा त्या विषयातील अनुभव किती?
 • संपादकांचे आणि मालकांचे आशयाची निर्मिती आणि सादरीकरण या संदर्भात प्राधान्यक्रम काय आहेत?
 • संपादक आणि मालकांचे लोकशाही व्यवस्थेबद्दलचे मत काय आहे? तटस्थता म्हणजे नेमके काय, याबद्दल त्यांचे काय मत आहे?
 • माध्यम संस्थेमध्ये सध्या किती कर्मचारी काम करतात?
 • माध्यम संस्थेतून कोणी सोडून जात असेल तर त्याला जाऊ दिले जाते का? त्याला थांबविण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का?
 • माध्यम संस्था नक्की कोणाच्या मालकीची आहे? त्यासाठी लागणारे पैसे नक्की कुठून येतात?
 • इतर माध्यम संस्थांशी स्पर्धेचा विचार करता तुमच्याकडे काय वेगळे आहे?
 • तुमच्या न्यूजरूममध्ये काम करणारे कर्मचारी किती जुने आहेत?

अजून एक उदाहरण हिथरने दिलंय. त्या म्हणतात. स्मृतिभ्रंशाचा त्रास असलेले माझे एक वयस्कर नातेवाईक नेटफ्लिक्स वापरू शकतात. पण त्यांना न्यूज वेबसाईट किंवा न्यूज ॲप कसे बघायचे हे समजता समजत नाही. इतकी त्याची रचना अवघड करून ठेवलेली असते.

जोपर्यंत आपण लोकांकडून किंवा वाचकांकडून पैसे घेत नाही, तोपर्यंत आपण गुणवत्तापूर्ण, मूल्याधारित आशय निर्माणच करू शकत नाही. फुकट म्हटल्यावर कोणीच कोणाला बांधील नसते, असेही त्यांनी म्हंटलंय.

शेवटी एक महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. माध्यमातील कंपन्यांकडे पैसे नाहीत, असे अजिबात नाही. पण तो पैसा आला कुठून, हे अनेकवेळा स्पष्ट होत नाही. त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो. जो पैसा येतो तो बऱ्याच वेळा मालक किंवा वरिष्ठच लाटतात. कंपनीतील शेवटपर्यंत त्याचा फायदा पोहोचतच नाही. असे सगळ होत असताना आपण सब्सक्रिप्शनरुपी पैसा दिला तर त्याचाही मूठभर लोकच फायदा करून घेणार नाही, याची खात्री कोण देणार, असे सामान्यांना वाटत असावे, म्हणूनच ते ओटीटीसाठी पैसे द्यायला तयार होतात पण माध्यमांसाठी नाही, असेही लेखकाने म्हटले आहे. खरंतर या लेखातील बरेच संदर्भ हे अमेरिकेतील आहेत. पण तो वाचताना माझ्या डोळ्यासमोरून अनेक अनुभव, आठवणी, घडामोडी जाऊ लागल्या… बाकी सूज्ञास जास्त सांगण्याची गरज नाही…

People pay for Netflix, Amazon Prime, so why not for journalism?

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*