नवे नाना; सवाई घाशीराम…!!

मुख्यमंत्री डोळ्यांवरची आणि बुद्धीवरची झापडे कधी काढणार पेशवाईतले नाना घरात बसून घाशीरामाला खेळवायचे. घाशीराम पुण्यात फिरून नानाच्या बोटावर नाचत “कारभार” करायचा. सध्याचे नाना स्वत: महाराष्ट्रात फिरून घरात बसलेल्या घाशीरामाला खेळवत आहेत. आणि हे घाशीराम वाघाच्या संघटनेची वाट लावत आहेत.


 विनायक ढेरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी गाढ झोपेत आहेत काय?, माहिती नाही. पण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी आपल्या डोळ्यांवर आणि राजकीय बुद्धीवर झापडे ओढून घेतल्याचे नक्की दिसत आहे. कारण विरोधी पक्ष एवढा आरडाओरडा करताहेत पण मुख्यमंत्री ढिम्म आहेत. हरकत नाही. विरोधकांचे कामच ओरडण्याचे असते. पण… दस्तुरखुद्द शरद पवारांनी तुळजापूर मुक्कामी मुख्यमंत्र्यांना एवढे “शालजोडीतले हाणल्यावर” देखील त्यांनी जागे होऊ नये? आपल्याच डोळ्यांवर आणि राजकीय बुद्धीवर आपणच ओढून घेतलेली झापडे काढू नयेत?… कमाल आहे.

पवारांनी तुळजापूरच्या भर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची अक्षरशः “काढली.” त्यांच्या वक्तव्यातून “बिटविन द लाइन्स” वेगळे शोधायची अजिबातच गरज नाही. ते स्वच्छ आणि स्पष्ट बोललेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली म्हणूनच ते घरी बसून कारभार बघत आहेत. आम्ही सगळे जण बाहेर फिरतोय आणि त्यांना माहिती देतोय. मग त्यावर ते निर्णय घेतात. पवारांच्याच भाषेत बोलायचे झाले तर “निकाल” घेतात.

अहो, मुख्यमंत्री महोदय, इथे महाराष्ट्राचा निकाल आणि शिवसेना नावाच्या वाघाच्या संघटनेचा “निक्काल” लागायची वेळ आलीय आणि तुम्ही पवारांच्या विनंती – सूचनेनुसार घरी बसून कारभार करता आहात. व्वा रे कारभार…!! हा तर घाशीरामापेक्षा “सवाई घाशीराम” निघाला. पेशवाईलता घाशीराम म्हणे नानाच्या खेळवण्यावरून निदान प्रत्यक्ष पुण्यात फिरून तरी कारभार चालवायचा. “नाना बोले… घाशीरामाचा कारभार चाले” असा तो मामला होता. आणि इथले पवार नाना तर उघडपणे घाशीराम उद्धव यांना घरात बसून कारभार करायला सांगताहेत आणि स्वतः राज्यभर फिरत आहेत. यातले इंगित समजायला फार मोठी राजकीय बुद्धिमत्ता लागते असे नाही. फक्त डोळ्यांवरची आणि बुद्धीवरची झापडे उघडायची गरज आहे आणि तीच नेमकी उद्धव ठाकरे उघडत नाहीत. समस्या की जड़ यहाँ हे.

पवारांना काही घरात करमत नाही. नातवंडांशी खेळता येत नाही म्हणून पवार काही फिरत नाहीएत. ते राष्ट्रवादीच्या फेरबांधणीसाठी फिरताहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निदान अश्रू पुसण्याचा आव तरी आणताहेत. मध्येच एकनाथ खडसेंसारख्या भाजपमधून गळायला लागलेल्या नेत्याला मधाचे बोट चाटवताहेत. आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज घराबाहेर पडून फक्त अक्कलकोट तालुक्याचा दौरा करून ओल्या दुष्काळाच्या शितावरून भाताची परीक्षा या म्हणीप्रमाणे पाहणी करून आढावा बैठक घेऊन मुंबईच्या घरी परतणार आहेत.

शरद पवार ३० -३५ गावांमध्ये जाताहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील साधारण तितक्याच तालुके – गावांचा दौरा करताहेत. ते पत्रे लिहितील आणि बिहारच्या प्रचाराला निघून जातील. ना त्यांनाही पवार करत असलेल्या राष्ट्रवादीच्या फेरबांधणीची चिंता आहे… ना आपल्याच पक्षातील नाराजांची. पत्र लिहिण्याची आणि बिहाराच्या प्रचाराची असाइन्मेंट कंम्लीट करायच्या मागे ते आहेत.

नवे नाना राष्ट्रवादीची फेरबांधणी करण्यासाठी फिरताहेत. त्यांचे आमदार नातू कर्जत – जामखेडच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करून थेट पंतप्रधान, अर्थमंत्र्यांची सल्लागारी करताहेत. आणि दोन हिंदुत्ववादी पक्षांचे सध्याचे नेते एकमेकांचा राजकीय द्वेष करण्यात मग्न आहेत… पवार या दोन हिंदुत्ववादी पक्षांची वाट लावल्यावर मगच या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जाग येणार आहे का? महाराष्ट्राला या सगळ्यांनी मिळून ओल्या दुष्काळाच्या पाण्यात केव्हाच विसर्जित केले आहे. त्यांना जनतेची किंमत उरलेली नाहीये.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*